पिंपरी
येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सभागृहात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समारंभास आमदार अमित गोरखे, संस्था अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, पिंपरी चिंचवड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, टास्क फोर्स प्रमुख डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, प्राचार्य डॉ. ललित कानोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी आपल्या भाषणात विश्वास पाटील यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे मराठी साहित्याला नवी दिशा मिळेल. त्यांनी महाराष्ट्राचा दुर्लक्षित इतिहास उजेडात आणला असून ‘पानिपत’, ‘झाडाझडती’ आणि ‘महानायक’ ही त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहेत.”
सत्कारास उत्तर देताना विश्वास पाटील यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी तरुण पिढीला मोबाईलच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याचे आवाहन केले. “तंत्राचे गुलाम होऊ नका, माय मराठीचा वापर करून संस्कृती आणि चैतन्य जपा,” असे ते म्हणाले. त्यांनी ‘आस्मान भरारी’ या आगामी साहित्यकृतीवरही भाष्य केले.
कार्यक्रमात आमदार अमित गोरखे, डॉ. संदीप पाचपांडे, विश्वेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी केले.
