तळेगाव दाभाडे
एमआयडीसी तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील फूल उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून, शासनाच्या धोरणांमुळे त्यांची कोंडी झाल्याचा आरोप बुधवारी (दि. २५) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. बळीराजा अनुदान योजना अचानक बंद करणे, वीज ग्राहक वर्ग बदलणे, मागील दोन ते तीन वर्षांची बीले एकरकमी आकारणे आणि थकबाकीच्या कारणास्तव थेट वीज तोडणी मोहीम राबविणे, या निर्णयांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
फ्लोरीकल्चर पार्कमध्ये अत्याधुनिक हरितगृह प्रकल्प उभारून मोठ्या प्रमाणावर फुलउत्पादन केले जाते. या उत्पादनासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक असताना, अनुदान रद्द केल्याने वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्राहक वर्ग बदलल्यामुळे दरांमध्येही वाढ झाली असून, काही शेतकऱ्यांना लाखो रुपयांची बीले आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मागील काही वर्षांची थकबाकी एकरकमी भरण्याचा आदेश देणे म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत ढकलण्यासारखे असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
या संदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. निर्णय प्रलंबित असतानाही वीज तोडणीची कारवाई सुरू ठेवणे अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठा खंडित झाल्यास हरितगृहातील फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा संघटनेचे सचिव मल्हार ढोले यांनी दिला. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेस मल्हार ढोले, मयूर भोसले, अद्वैत भट, शुभाग बोरी यांच्यासह मोठ्या संख्येने फुलउत्पादक शेतकरी उपस्थित होते.
नियमानुसारच कारवाई – महावितरणचा दावा
दरम्यान, तळेगाव एमआयडीसी परिसरातील थकीत वीज बिलांबाबत संबंधित ग्राहकांना वारंवार सूचना देण्यात आल्या. थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही देण्यात आली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वीज कनेक्शन तोडणी मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली. ज्या ग्राहकांनी अंशतः रक्कम भरली आहे, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे उपकार्यकारी अभियंता जयप्रकाश सागरे यांनी स्पष्ट केले.
