Home पिंपरी चिंचवड संतांच्या भूमीत मिळालेला पुरस्कार आशिर्वादासारखा – रामदास फुटाणे

संतांच्या भूमीत मिळालेला पुरस्कार आशिर्वादासारखा – रामदास फुटाणे

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांना मानपत्र प्रदान व युवा दिग्दर्शक सुजय डहाके यांचा सन्मान

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला संस्कार दिले. देहू आणि आळंदी ही फक्त तीर्थक्षेत्रे नाहीत, तर मराठी संस्कृतीची संस्कारक्षेत्रे आहेत. तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या विचारांनी ही भूमी मराठीची खरी विद्यापीठे आहे. या विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या पिंपरी चिंचवड या कामगार नगरीत मला पुरस्कार मिळतोय, हा माझ्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असून, हा पुरस्कार मला आशिर्वादासारखा आहे. कामगार नगरीने केलेला सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय पर्वणी आहे, असे उद्गार ज्येष्ठ कवी-साहित्यिक रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये रामदास फुटाणे यांना मानपत्र देण्यात आले. आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महापालिकेच्या वतीने हे मानपत्र प्रदान केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांचा विशेष सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

रामदास फुटाणे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे. अशा भूमीत अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आपण सर्वजण अभिजात मराठी भाषेतील साहित्याचा आणि कलेचा आनंद घेत आहोतच, पण ही भाषा जतन करून तिचा वारसा नव्या पिढीकडे देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या विविध वात्रटिका आणि कवितांचे सादरीकरण केले.

आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शहरवासियांच्या वतीने ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा मानपत्र देऊन सन्मान केला, हे आनंददायी आहे. रामदास फुटाणे म्हणजे महाराष्ट्राचा हासरा आरसा आहे. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून ग्रामीण भागातील कवींची मोठी फळी उभी केली आहे. सामना सारख्या अजरामर चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. आपले मराठी साहित्य जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. फुटाणे यांच्यासोबत आज युवा दिग्दर्शक सुजय डहाके यांचाही सन्मान करण्यात आला. महापालिकेने यानिमित्ताने खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांच्या कार्याचे गौरव करण्याचे काम केले आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करून पिंपरी चिंचवड महापालिकेने मराठी भाषेचा मोठा गौरव केला आहे. हा महोत्सव उत्तम पार पाडण्यास महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यशस्वी झाले आहेत.’

सन्मानाला उत्तर देताना सुजय डहाके म्हणाले, ‘जन्मभूमीत आपले कौतुक झाल्याने आज खूप छान वाटत आहे. आजचा सन्मान हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील अनेक कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव नेले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सारख्या उपक्रमांतून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून, यामुळे खऱ्या अर्थाने येथील सांस्कृतिक चळवळीला चालना मिळत आहे. या शहरातून नवोदित कलाकार घडणे महत्वाचे आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात यावा. या माध्यमातून जागतिकस्तरावरील कलाकार या शहरात येतील. या कलाकारांसोबत आपल्या शहरातील स्थानिक कलाकारांना चर्चा करण्याची संधी मिळेल. स्थानिक कलाकारांना एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होईल.’

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद  पिंपरी चिंचवड शाखा या दोन्ही संस्थांनी चांगले सहकार्य केले. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला या सप्ताहात सहभागी होता यावे,  या अनुषंगाने उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रसिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अभिजात मराठी भाषा सप्ताह यशस्वी होऊ शकला,’ असेही त्या म्हणाल्या.

यावेळी भाऊसाहेब भोईर आणि राजन लाखे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले,  तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपायुक्त अण्णा बोदडे यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय विकास डोरनाळीकर यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन मनोज डाळींबकर यांनी केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00