पिंपरी
नेहरूनगर, पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव होत असून नागरिक, वकिल, न्यायालयीन कर्मचारी यांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त व उपायुक्त (पशुवैद्यकीय विभाग) यांना मेलद्वारे अधिकृत निवेदन देण्यात आले.
न्यायालय परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तरीदेखील परिसरात मोकाट कुत्रे धावत फिरणे, सतत भुंकणे, तसेच नागरिकांना चावण्याच्या घटना घडत असल्याने भीतीचे व गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर निवेदनामध्ये महानगरपालिकेच्या पशु नियंत्रण विभागामार्फत तात्काळ कारवाई करून परिसरातील कुत्रे पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची, तसेच न्यायालय परिसरात स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन अॅड. धम्मराज साळवे, वरिष्ठ उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या मार्फत पाठविण्यात आले असून महानगरपालिकेने तातडीने यावर कार्यवाही करून न्यायालय परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
