Home पुणे सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

सारथीच्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम करताना लोकाभिमूख काम करुन, समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मदत करावी. या कामात सातत्य ठेऊन संस्थेचा नावलौकीक वाढवा. सारथी ही संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कार्यरत असून, त्यांच्या नावाला साजेसे असे काम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने संस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. संस्थेच्या माध्यमातून आपणास जे यश मिळाले आहे, त्या यशाचे अनुभव इतरांना सांगून, सारथीच्या माध्यमातून पुढील विद्यार्थ्यांना समर्पक भावनेतून मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य क्रांतीकारी असून ते विसरता येणार नाही. देशात अशा प्रकारची एकही सामाजिक संस्था नाही, जिच्या उद्दिष्टांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विचार नाही. सामाजिक क्षेत्रात प्रत्येक संस्था व संघटना ही राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊनच पुढे जाते किंवा जाऊ शकते, असे मत व्यक्त करुन राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था या सर्वांच्या कार्याचा आदर्श हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजच आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आपल्या मनोगतात म्हणाले, महाराष्ट्रात 1980 च्या दशकात युपीएससी व एमपीएससी मध्ये निवड होण्याचे प्रमाण हे नगण्य होते. गेल्या 4 ते 5 वर्षात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फक्त रोजगाराच्या बाबतीतच नाहीतर समाजाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आगामी काळात सारथी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात उत्तोमत्तम प्रशासकीय अधिकारी तयार होऊन महाराष्ट्राच्या विकासास मोठी गती देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व शिष्यवृत्ती यांचे सादरीकरण करण्यात आले. सारथीच्या यशोगाथांवर आधारित “विजयीभव” व “सारथी उपक्रम माहिती” या पुस्तकांचे प्रकाशन, तसेच 9 युपीएससी व 91 एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सारथीच्या मदतीने यश संपादन करू शकलो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमास सारथी संस्थेचे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन स्वाती पाटणकर, तर आभार प्रदर्शन उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00