Home पिंपरी चिंचवड अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

आयटीयन्सच्या भूमिकेला पूर्णत: समर्थन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

 भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

पिंपरी- चिंचवड 

हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांवर उपाययोजनांची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटीयन्स आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी. हिंजवडीसह सात गावांचा समावेश आणि चाकण-आळंदी-खेड अशी नवी महापालिका निर्मितीबाबतच्या प्रस्तावावरही निर्णय व्हावा. आयटीयन्सच्या भूमिकेशी आम्ही पूर्णत: सहमत आहोत आणि सोबत आहोत. त्यामुळे आगामी पावसाळी आधिवेशनामध्ये या मुद्यावर राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देशभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणारे हिंजवडी आयटी पार्क सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. पायाभूत सुविधांची दुरवस्था, रस्त्यांची खराब अवस्था, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणी व ड्रेनेज समस्यांमुळे येथील आयटी व्यावसायिक आणि रहिवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर #UNCLOGHinjawadiITPark ही स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून, अवघ्या दोन-तीन दिवसांतच या मोहिमेला २५ हजारांहून अधिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

या मोहिमेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या असून, या भागाच्या विकासासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, वाकड-पिंपरी-चिंचवड रेसिडेन्ट डेव्हलपमेंट ॲन्ड वेलफेअर असोसिएशनचे प्रमुख सचिन लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान हिंजवडी आयटी हबमध्ये उद्भवलेल्या विविध समस्या आणि त्यावर अपेक्षित उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. पायाभूत सुविधा सक्षम करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, हरित क्षेत्राचे जतन आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपले विचार मांडले.

दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या आजुबाजुला असलेल्या पीएमआरडीए हद्दीमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करणार आहोत. वाहतूक समस्या, पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्था, कचरा समस्या आणि नागरी आरोग्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण पुढाकार घेण्याची माझी भूमिका आहे, असे यावेळी आमदार लांडगे यांनी सांगितले.
सात गावांचा महापालिकेत समावेश…
या भागातील वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजांचा विचार करता हिंजवडीसह अन्य सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. या प्रस्तावावर भाजपा महायुती सरकार सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच, शहराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चाकण, आळंदी आणि खेड या नगरपालिकांना एकत्र करून नवीन महापालिका निर्माण करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत.

हिंजवडी आयटी पार्कसारखा महत्त्वाचा आर्थिक केंद्रबिंदू जर मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला, तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण शहराच्या विकासावर होऊ शकतो. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, स्थानिक संघटनांची भूमिका आणि राजकीय पुढाकार या सर्व घटकांमुळे #UNCLOGHinjawadiITPark ही मोहीम आता केवळ ऑनलाईन आंदोलन न राहता, व्यवस्थेत बदल घडवून आणणारी चळवळ ठरली आहे. सरकार म्हणून आम्ही या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच, आम्ही चाकण-आळंदी आणि खेड नगरपालिका मिळून नवीन महापालिका निर्माण करण्याच्या मागणीचेही समर्थन करीत आहोत. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील ताण कमी होईल आणि सभोवतालचा परिसर विकसित होईल, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00