19
देहू
आयुष्यात सुखदुःखाचे क्षण हे ठराविक काळा पर्यंतच येत असतात. सुखाच्या क्षणांसाठी काही काळ धीर धरावा लागतो असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक सचिन दादा पवार यांनी व्यक्त केले.
अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू आयोजित गाथा चिंतन सत्र संत साहित्याचे अभ्यासक सचिनदादा पवार यांच्या प्रासादिक वाणीतून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाले. हे ३३ वे गाथा चिंतन सत्र होते.
सचिनदादांनी माणसाच्या जीवनातील सुखदुःखाच्या क्षणांचा वेध घेत असताना अतिशय सुंदर चिंतन मांडले. डोक्यावर असणाऱ्या ढगांची सावली आयुष्यभर सावली देत नाही अगदी त्याच पद्धतीने जीवनात विषय वासनांच्या आधीन होवुन मिळणारे सुख आयुष्यभर कधीच माणसाला आनंद व समाधान देवु शकत नाही. त्यामुळेच संसारातील तहान या भौतिक सुखाने कधीच भागत नाही.
जीवनात आलेलं दुःख देखील एक दिवस निघून जात असतं… जीवनाच्या अंगणात पुन्हा सुखाचे कवडसे येणार असतात पण जीवनात तोपर्यंत धीर असावा लागतो… संयम असावा लागतो… जीवनातील याच विचारांसाठी संत विचारांचे बोट आपण धरले पाहिजे. कारण संत विचार जीवनाला योग्य दिशा देत असतात. जीवनाचे शाश्वत सुख आपल्या ओंजळीत टाकत असतात. आयुष्याच्या वादळात हेलकावे खाणारी ही जीवननौका दु:खाची नदी पार करित सुखाच्या पैलतीराला घेवुन जातात. म्हणुनच जीवनात धीर धरून संत विचारांच्या वाटेने अखंड चालत रहावे.
धीर तो कारण ।
सहाय्य होतो नारायण ॥
पुढील गाथा चिंतन सत्र रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होईल अशी माहिती अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास कंद यांनी यावेळी दिली.
Please follow and like us:
