75
देहू
अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार संत वाङ्मयाचे निष्ठावंत अनुवादक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय प्रा. वेदकुमार वेदालंकार यांना संत साहित्याच्या अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सर व संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच तपोनिधी श्री संत नारायण महाराज पुरस्कार “ अभंगवारी”या कार्यक्रमाचे प्रमुख निर्माते व विश्व वारकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीपदादा जिवलग कोहळे व फेसबुक दिंडीचे प्रवर्तक श्री.स्वप्निल रामभाऊ मोरे व फेसबुक दिंडी टीम यांस प्रदान करण्यात आला.
या भक्तीमय सोहळ्यासाठी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त श्री.शिवाजी महाराज मोरे,संत साहित्याचे अभ्यासक व गाथा चिंतनचे निरूपणकार श्री. सचिनदादा पवार, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता ताई घार्गे, अभंग अक्षरे फेसबुक पेजचे प्रवर्तक, चित्रकार श्री.प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री. श्रीरंग गायकवाड सर, संगीत देव बाभळीचे संगीतकार श्री. आनंद ओक, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुरेश गाडे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी देहू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
गाथा चिंतन हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी याप्रमाणे श्रीक्षेत्र देहू मध्ये अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या गाथा चिंतनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे साध्या सोप्या भाषेत निरूपण केले जाते. गाथा चिंतन २५ वे सत्र मोठ्या भक्तीमय महोत्सवात ह.भ.प.सचिनदादा पवार यांच्या प्रासादिक वाणीतून संपन्न झाले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक आपल्या मनोगतातून केले. “ श्री क्षेत्र देहूच्या पावनभूमीतील पुरस्कार म्हणजे या पावन भूमीत विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी आमच्या जीवन कार्याला दिलेल्या कृपा आशीर्वाद आहे असे आम्ही समजतो,” अशाच भावना याप्रसंगी पुरस्कारार्थींच्या होत्या. या पुरस्काराने या सर्वांची मने भारावुन गेली होती.
या कार्यक्रमात आदरणीय जेष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड संपादित “ज्ञानोबा-तुकाराम” या अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. त्या समवेत फेसबुक दिंडी टीम यांच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नामावलीचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विकास कंद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्वातीताई गोडसे यांनी केले.
Please follow and like us:
