91
औंध
पुणे महानगरपालिका मार्फत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्विसेस फाउंडेशन या समाजसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी येथील शांता आपटे घाट तसेच महादेव घाटावर पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांनी गणेशमूर्ती नदीत विसर्जित न करता हौदात विसर्जित करावी यासाठी जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांमध्ये औंध क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, मुकादम सिद्धार्थ बागुल,आकाश साठे, वनवर्धिनी फाउंडेशनचे विजय ढोणे,आकाश ढोणे, अजित थोरात, शेल्टर संस्थेच्या टीम लीडर सुबोधिनी कांबळे, संजय मोरे, प्रियांका साळुंके, सना शेख, श्रेयष क्षीरसागर, राजश्री कदम, यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अनिकेत चंदन, साहिल बिराजदार, वैभव होले,श्रीश शिंदे यांनी सहभाग घेतला.
पारंपारिक पध्दतीने गणपती विसर्जन नदीमध्ये करण्यात येते. गणेश मूर्तीसोबतच निर्माल्य सुद्धा नदीपात्रात टाकण्यात येते. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषित होते. याप्रमाणे मुळा – मुठा नदी प्रदूषित होऊन पुणेकरांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. हे टाळण्यासाठी महानगरपालिकेमार्फत हौदाची सोय केली होती. या हौदातच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे यासाठी नागरिकांचे मत परिवर्तन करण्याचे काम महापालिका तसेच शेल्टर आणि इकोसन संस्थेमार्फत केले जात होते. गणेश मूर्तीसोबत निर्माल्य ही नदीत टाकले जात होते. यामुळे ही मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषित होते. त्यामुळे निर्माल्यामधील ओला व सुका कचरा विभाजित करून (फुले, माळा, पाने) त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी निर्माल्य कलशामध्ये टाकावे. तसेच प्रसाद (मोदक, लाडू इ.) नदी व हौदामध्ये न टाकता त्याचे वाटप करावे यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह संस्थेच्या प्रतिनिधींनी व स्वयंसेवकांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
उपक्रमादरम्यान नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी इतरत्र कचरा पडला जाऊ नये यासाठी नागरिकांना कचरा संकलन केंद्रामध्ये कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त केले.
Please follow and like us:
