21
गणेश मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करुन बनविणार कुंंड्या
पिंपरी
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा उत्सव असून, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी पिंपरीत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला जात आहे. ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने गेल्या सहा वर्षांपासून सामूहिक गणेश विसर्जनाची मोहिम हाती घेतली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.) च्या मूर्तींवर केमिकल प्रक्रिया करून त्यापासून कुंड्या तयार केल्या जातात व त्या मोफत शाळा आणि सामाजिक संस्थांना वितरित केल्या जातात. यावर्षी आतापर्यंत तब्बल २७०० मूर्तींचे विसर्जन झाले असून, किमान ६० हजार मूर्ती विसर्जित होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी (२०२४) ४४ हजार मूर्तींचे विसर्जन झाले होते. या संपूर्ण प्रक्रियेवर आसवानी असोसिएट्स तर्फे श्रीचंद शामनदास आसवानी लक्ष ठेवत आहेत.
दरम्यान, पिंपरीत आसवानी असोसिएट्स आणि ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट यांच्या पुढाकाराने गणेशभक्तांसाठी कृत्रिम तलावाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. या वेळी खासदार बारणे म्हणाले, “गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय ही खरोखरच कौतुकास्पद आहे. पवना नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.”
या वेळी आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर हीराबाई घुले, डब्बू आसवानी, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, प्रसाद शेट्टी, मनपा उपायुक्त संजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्यासह संयोजक विजय आसवानी, उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पारंपरिक भक्तीभावाला धक्का न लावता पर्यावरण संरक्षणाचा संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याने, पिंपरीतील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत विसर्जनाला पर्यावरणपूरक दिशा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Please follow and like us:
