Home पिंपरी चिंचवड अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘सुर’, ‘शब्द’ आणि ‘शौर्य’ यांचा संगम!

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘सुर’, ‘शब्द’ आणि ‘शौर्य’ यांचा संगम!

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित कार्यक्रमांतून मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेचा उभा राहिला अभिमान

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

मराठी भाषेचा गंध, चित्रपटसृष्टीचा तेजोमय प्रवास आणि सुरांचा सुवास… या त्रिवेणी संगमातून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहात’ एक अविस्मरणीय सांस्कृतिक क्षण उजाडला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये झालेल्या ‘राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या कार्यक्रमातून रुपेरी पडद्यावरच्या मराठी चित्रपटांचा शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास सुरेल गाण्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला गेला आणि एकप्रकारे रसिकांनी या स्वरयात्रेतून चित्रपटसृष्टीचा प्रवासच अनुभवला. तर मराठी नाटक ‘सूर्याची पिल्ले’ आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम ‘गजर मराठीचा…. जागर शाहिरीचा’ या कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होत आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली साजरा करण्यात येणाऱ्या या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण प्रवास मांडणारा ‘राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा कार्यक्रम सादर झाला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी समन्वय अधिकारी किरण गायकवाड, समाजसेवक विशाल शेडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे राजेंद्र बंग, संतोष रासणे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुरेल गाण्यांचे सादरीकरण करीत रसिकांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १९१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटापासून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या चित्रपटापर्यंत नेले. बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान, प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेची प्रेरणादायी कथा, पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ याचे स्मरण, या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीचा पाया पुन्हा एकदा उजळवला.

यानंतर व्ही. शांताराम यांच्या कलादृष्टीचा परिचय, पु. ल. देशपांडे यांचे मानवी भावनांना स्पर्श करणारे चित्रपट, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या चित्रपटसंगीतासाठीचे योगदान, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत, आणि दादा कोंडके यांच्या हास्यविनोदाने सजलेले मराठीपण, या सगळ्यांचा संगीतमय पट रसिकांसमोर उलगडला.

‘हृदयी प्रीत जागते’, ‘माझं ठरल्यालं लगीन मोडलं गं’, ‘ग साजणी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अनेक अजरामर गाणी कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. १९८० च्या दशकातील विनोदी आणि भयपट यांचा संगम, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे सुवर्णक्षण, आणि किशोरकुमार यांनी पहिले गायलेले मराठीतील गाणे, यांसह मराठी सिनेमाची उत्क्रांती रसाळ शैलीत कलाकारांनी रसिकांसमोर उलगडली.

२००० नंतरच्या काळात इतिहास, चरित्र आणि सामाजिक वास्तव सांगणारे ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘महाराष्ट्र शाहीर’ यांसारखे चित्रपट मराठी सिनेमा नव्या उंचीवर घेऊन गेले, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. संगीतकार अजय–अतुल यांच्या सुरेल मेडलेने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू साधला. ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ तसेच या चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला मानाचा मुजरा करण्यात आला.

संजय चांदगुडे व प्रशांत बरीदे यांनी उत्कृष्ट निवेदन केले. गायक समीर नगरकर, पियुष भोंडे, अजय खटावकर, प्रशांत व्ही. साळवी, अजिंक्य देशपांडे, गायिका शुभ्रा घायतडके, निशा गायकवाड, सुवर्णा कोळी, प्रियल निळे, सावनी सावरकर यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले. त्यांना वादक अमृता दिवेकर, अमन सय्यद, विशाल थेलकर, सचिन वाघमारे, अभिजित भदे, नागेश भोसेकर, हर्षद गणबोटे यांनी साथ दिली.

प्रभावी अभिनय आणि कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सादर करण्यात आलेले ‘सूर्यांची पिल्ले’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनाला भावले. प्रभावी संवाद, सशक्त अभिनय आणि सुंदर सादरीकरणाच्या बळावर या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कलाकार पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, सुनील बर्वे, सुहास परांजपे आणि शर्वरी पाटणकर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ठरल्या. नाटकातील संवाद, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेच्या सुरेख संगमामुळे रंगमंचावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. प्रत्येक प्रसंगातील अभिनयातील नेमकेपणा आणि भावनिक अभिव्यक्तीमुळे वातावरण रंगतदार बनले. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी नाटकाच्या टीमला उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृतींपैकी एक म्हणून ‘सूर्यांची पिल्ले’ या नाटकाने अभिजात मराठी भाषा सप्ताहात आपला ठसा उमटवला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, आश्विनी गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गजर मराठीचा, जागर शाहिरीचा

अभिजात मराठी भाषा सप्ताहात आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सादर झालेला ‘गजर मराठीचा, जागर शाहिरीचा’ हा कार्यक्रम लोककला आणि मराठी अभिमानाचा अद्भुत संगम ठरला. या कार्यक्रमात सादर झालेल्या शाहिरी कलाकृतींनी मराठी भाषेचा गजर आसमंतात दुमदुमवला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणगायनाने झाली. त्यानंतर ‘माझ्या जिजाऊची पुण्याई’, ‘चमके शिवबाची तलवार’ अशा विविध पोवाड्यांनी सभागृहात उत्साह आणि जोश चेतवला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवगाथेवरील नाट्यमय सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात शाहीर प्रकाश ढवळे, अशोक कामटे, चैतन्य काजोळकर, वनिता मोहिते, नमन कांबळे, गुरुराज कुंभार तसेच वादक उद्धव गुरव (ढोलकी), वैभव गोरखे (संबळ), सुहास माळी (तुतारी), ईशा बांदिवडेकर, कस्तुरी चंद्रडकर, शाल्मली जोशी, नीना देशपांडे, चित्रा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या सर्व कलाकारांनी केलेल्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00