पुणे
‘विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव अशी सोळा प्रकारची आयुधे असतात. त्यांचा योग्य व परिणामकारक वापर केल्यास जनतेच्या समस्या सुटून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो,’ असे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
‘जनतेच्या अस्वस्थतेला वाचा फोडणारे प्रश्न आमदारांनी विधिमंडळात मांडले पाहिजेत. त्यासाठी त्यांना विविध अधिकाररुपी आयुधांचा वापर करता येऊ शकतो. तारांकित, अतारांकित प्रश्न मांडल्यास त्याची माहिती जनतेलाही कळाली पाहिजे. अनेक आमदार वेगळी वेशभूषा करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतात. मात्र प्रसिद्धीसाठी काम करण्यापेक्षा लोककल्याणाचे योग्य मुद्दे चर्चेत यावे, यावर भर दिला पाहिजे,’ असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
आमदारांच्या क्षमता विकसनातून विधिमंडळाचे कामकाज गुणवत्तापूर्ण करण्याचा ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो म्हणाले. ‘विधानसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जनहिताचे काम करू शकतात. त्यासाठी आमदारांना विधासभेच्या कामकाजाची बारकाईने माहिती असली पाहिजे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी विविध अधिकार-आयुधांचा वापर केला पाहिजे. कायदे आणि अर्थसंकल्पाविषयी आवड असली पाहिजे. कामकाजाचे बारकावे ठावूक असले पाहिजेत. लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायम जनतेच्या हृदयात स्थान असते,’ असेही महातो यांनी आवर्जून नमूद केले.
