पिंपरी
सर्वांना प्रकाश व ऊर्जा देणाऱ्या उगवत्या सूर्याला नमन करून आज जागतिक सूर्यनमस्कार दिनाची उत्साहात सुरूवात करण्यात आली. सूर्यनमस्कार घालण्यात मग्न झालेले विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांच्या सहभागामुळे चिंचवड, केशवनगर येथील महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुलातील वातावरण चैतन्यमयी झालेले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आशाकिरण सोशल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवास क्रीडा अधिकारी अनिता केदारी, माजी नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, पर्यवेक्षक गोरख तिकोणे, दीपक कन्हेरे, बन्सी आढावे, सुनील ओव्हाळ, प्रभारी आरोग्य निरीक्षक दिलीप जाधव, क्रीडा विभागाचे शंकर बुचडे, नंदू आढारी, आशाकिरण फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, कार्याध्यक्ष गणेश विपट, सचिव कृष्णा पवार, खजिनदार म्हाळसाकांत देशपांडे, योगगुरू निर्मलकुमार गुप्ता, प्रशांत गाडेकर यांच्यासह महानगरपालिकेतील शाळांसह विविध खासगी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ याकाळात सूर्यनमस्कार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप ४ फेब्रुवारीला जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाने झाला.
याप्रसंगी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार आणि व्यायामाचे महत्त्व सांगताना ‘आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाची खूप आवश्यकता आहे. सूर्यनमस्कार आणि व्यायाम याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आपलं शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. दररोज किमान एक तास तरी व्यायाम प्रत्येकाने करणे महत्त्वाचे आहे. आज जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव आपण साजरा करत आहोत. परंतु या महोत्सवापुरता केवळ एका दिवसासाठी सूर्यनमस्कार आणि व्यायाम मर्यादित ठेवू नका. तर नियमित व्यायाम करा,’ असा मोलाचा सल्ला दिला.
