Home पुणे ग्रंथालये लोकाभिमुख व्हावीत यासाठी शासनाचे प्रयत्न-ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

ग्रंथालये लोकाभिमुख व्हावीत यासाठी शासनाचे प्रयत्न-ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

कोथरूड येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाचन संस्कृती ही लोकचळवळ झाली पाहिजे ग्रंथालय लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी, पुणे यांच्यावतीने कोथरुड येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, लेखिका मंगला गोडबोले, गांधी स्मारक कार्यवाह राजन अनवर, जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह सोपान पवार, ग्रंथमित्र धोंडिबा सुतार आदी उपस्थित होते.

श्री. गाडेकर म्हणाले, पुणे ही शैक्षणिक पंढरी असून ज्ञानाची नगरी आहे. राज्यात वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी शासनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे व टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजमाध्यमांच्या युगात माध्यम बदलले असले तरी वाचन संस्कृती जोपासली जात आहे. राज्यातील ४३ शासकीय ग्रंथालयांचे ई-ग्रंथालय प्रणाली विकसित करण्यात येत असून आत्तापर्यंत ३८ लाख पुस्तके ई-ग्रंथालयांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. राज्यातील ३२७ ‘अ’वर्ग  ग्रंथालये ई-ग्रंथालय प्रणालीला जोडण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासन सकारात्मक असून लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शासनाकडून ग्रंथालयांना वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रंथालयाला २ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

डॉ. ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांचा ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमात सहभाग वाढवणे आवश्यक आहे. मोबाईलच्या युगात मुलांना वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटविण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. समाज माध्यमांमुळे माहिती तर मिळते परंतु वाचनातून आत्मसात केलेले ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात राहते. आपल्या परिसरातील किमान पाच लोकांना ग्रंथोत्सवाला भेट देण्याबाबत प्रोत्साहित करावे. किमान एक, दोन पुस्तक खरेदी करुन आपल्या घरामध्ये संग्रही ठेवावे. पालकांनी मुलांना मोबाईलच्या वाढत्या सवयीपासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.

श्रीमती गोडबोले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, शासनाच्या उपक्रमांची पूर्वप्रसिद्धी करावी. त्यामुळे शासनाचे उपक्रम अधिकाधिक यशस्वी होतील. साहित्य अकादमीने छापलेली पुस्तके सर्वांपर्यंत पोहोचवावीत, महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत, राष्ट्रीय पातळीवर गौरविलेल्या पुस्तकांच्या माहितीचे फलक ग्रंथालयात लावण्यात यावेत, असे आवाहन करुन मोबाईलच्या युगातही वाचनसंस्कृती जोपासली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हा ग्रंथोत्सव २३ जानेवारी २०२५ पर्यंत महात्मा गांधी स्मारक निधी, गांधी भवन, अंध मुलींच्या शाळेजवळ, कोथरुड येथे सुरु असून अधिकाधिक ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00