Home महाराष्ट्र कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन

शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न-कृषी मंत्री

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

बारामती

शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

ॲड.कोकाटे म्हणाले,  राज्यातील शेतकरी प्रगतशील आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट बी-बियाण्याचा वापर केला पाहिजे. कृषी क्षेत्रात चांगले काम करणारे शेतकरी, कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनावतीने सहकार्य  करण्यात येईल. केंद्र व राज्यशासन मिळून शेतकरी सुरक्षित आणि संरक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध लोकल्याणकारी निर्णय घेण्यात येतील. आगामी काळात नवीन योजना राबविण्यासोबतच आवश्यकतेनुसार जुने कायदे व योजनेतही बदल करण्यात येतील.

तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान आदी घटकांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.  कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान, पीकपद्धती तसेच कृषी क्षेत्रातील ज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रयत्न करण्यात आला आहे; आगामी काळात अशा प्रकारचे प्रदर्शन राज्यभर आयोजित करण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील. केवळ महिलांकरीता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करुन कृषी विषयक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पीकपद्धती आदींबाबत माहिती देण्यात येईल.

उमेद अभियान तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादन विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.कोकाटे म्हणाले.

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

श्री. भरणे म्हणाले, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिकतेची कास धरुन शेती करावी. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करुन कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. बाजारपेठेत पिकांचे नवनवीन वाणदेखील उपलब्ध असून त्याचाही वापर करावा. कृषी विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करुन अधिकाधिक उत्पन्न घेतात. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासोबत विविध स्पर्धेत सहभागी होतात. आगामी काळात शेतीला चांगले दिवस आणण्याकरीता धोरण आणावे, अशी श्री. भरणे सूचना केली.

इंदापूर येथे २२ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित प्रदर्शानात कृषी व जनावरे,  घोडेबाजार व डॉग शो असणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला अधिकाधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

कार्यक्रमात ॲड. कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील शैक्षणिक, कृषी, उद्योग आदी या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

श्री. जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. जगदाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00