मुंबई
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत पुण्यातील उबाठाच्या विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर या 5 नगरसेवकांनी उबाठा च्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संघटन पर्व प्रदेश प्रभारी आ. रवींद्र चव्हाण, आ. सुनील कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, बाबा मिसाळ आदी उपस्थित होते. हिंदुत्वाच्या विचारासाठी भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या या सर्वांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, पुण्यातील हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणे पसंत नव्हते. म्हणूनच अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्यामुळे शिवसेनेत अनेकांची घुसमट होत होती. या घुसमटीमुळेच या पाच नगरसेवकांनी उबाठा ची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की या प्रवेशामुळे पुण्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होणार आहे. संघटन पर्व प्रभारी आ. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपामध्ये आलेल्या सर्वांचा योग्य तो मान राखला जाईल.
यावेळी उबाठा चे कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख संतोष सोनवणे, उपविभाग प्रमुख नीलेश कुलकर्णी, अमोल रासकर, हरी राठोड आदी उबाठाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
