Home पुणे तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- उदय सामंत

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे- मंत्री सामंत यांची घोषणा

पुणे

राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे राज्य शासन आर्थिक ताकत निश्चितपणे उभी करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्र उदय सामंत यांनी दिली. पुढील वर्षात होणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी रितेश देशमुख यांना पहिला ‘विश्व मराठी संमेलन- कलारत्न पुरस्कार’ देण्यात आला.

व्यासपीठावर राज ठाकरे, सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी आमदार उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा मंत्री असणे यामुळे मी मला भाग्यवान समजतो, अशी भावना व्यक्त करुन मंत्री श्री. सामंत म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही 2 हजार वर्षापूर्वीची असल्याचे पुरावे केंद्राकडे सादर करण्यासाठी 12 वर्षे लागली. परंतु, गतवर्षी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता राज्याच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागाला भरीव तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

या संमेलनासाठी परदेशातून आलेल्या मराठी माणसांना येण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, यापैकी 80 टक्क्याहून अधिक जणांनी ही मदत नाकारली असून ती रक्कम मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाने वापरावी असे सांगितले आहे. हे मराठी माणसाचे मोठेपण आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी श्री. राज ठाकरे म्हणाले, इतर देश, राज्यातील लोक जसे आपल्या भाषेवर ठाम राहतात, त्याप्रमाणे मराठी माणसाने आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. आपल्या साहित्यिकांनी मार्ग दाखविला पाहिजे, बोलले पाहिजे. चांगले- वाईट समाजाला सांगितले पाहिजे. साहित्यिक जेव्हा बोलतील, तेव्हा लोक त्यांना ऐकतील आणि त्यांची पुस्तकेही वाचतील; आणि पुस्तकांतून प्रबोधन होईल. तरुणांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकांचा आणि ज्ञानाचा प्रचार प्रत्येक मराठी घरात गेला पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून एकत्र आला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

अभिनेते श्री. देशमुख म्हणाले, मराठी घरात जन्म घेणे हेच आपले भाग्य असते. आपण 10 वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर वडिलांनी मराठी चित्रपटांच्या अनुषंगाने विचारल्यानंतर ‘लय भारी’ हा चित्रपट केला जो प्रचंड लोकप्रिय ठरला. गेल्या 13 वर्षात केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती केल्याचे श्री. देशमुख यांनी आवर्जून सांगितले.

आपले आयुष्य पुस्तकातून घडल्याचे सांगून अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, दुसऱ्याने सांगून विचार बदलत नसतात. आपण आपल्यापासून सुरुवात केल्यावरच बदल होऊ शकतो. आपल्याला इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे असल्यास त्यातील संवाद हे मराठीतच लिहून घेतो आणि बोलतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00