10
उरण
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या अभियानात प्रभावी अंमलबजावणी करून वासांबे ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर आपली ठळक छाप पाडली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांना रु. 50,00,000/- (रुपये पन्नास लक्ष मात्र) इतक्या रकमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. ही कामगिरी खालापूर तालुका व रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
सदर यशस्वी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत वासांबे येथील सरपंच सौ. उमाताई मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैभव पाटील, श्री. संदीप शेठ मुंडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी स्वच्छता, वृक्षारोपण, पाणी संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन तसेच शाश्वत विकास या क्षेत्रांत नियोजनबद्ध व परिणामकारक अंमलबजावणी केली. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती, लोकसहभाग व सातत्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने स्पर्धेत आघाडी घेतली.
हे यश सक्षम नेतृत्व, प्रशासनाचे सुयोग्य नियोजन आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांचे फलित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या कामगिरीची प्रशासकीय स्तरावर नोंद घेण्यात येत असून संबंधित सरपंच, अधिकारी, सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Please follow and like us:
