30
पिंपरी
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे मार्ग पोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज खूप महत्त्वाची आहे. हेच लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेचे काम पाहत असताना मी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या जवळ गेलो असे मत शहराचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
विकासाचे काम करत असताना समाजातील शेवटच्या घटकाला त्याचा फायदा होणे हे अपेक्षित असते. ग्रामिण भागामध्ये काम करताना अनेक वेळा शासकिय यंत्रणा शेवटच्या घटकापर्यंत वेळेत पोहचू शकत नाही. परंतू अधूनिक तंत्रज्ञानाच्या वापराने हे काम सोपे होते. आपण करत असलेले प्रत्येक काम हे समाजाला किती उपयोगी ठरणार आहे याचा विचार सातत्याने केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत लोकनियुक्त सदस्य नसले तरीही येथील समस्या आणि विकासाची कामे यांच्यासाठी मी नेहमीच येथील आमदार, माजी नगर सदस्य यांच्या संपर्कात राहिलो आहे. त्यांच्याकडून आलेल्या सूचना आणि कामे पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहे. अनेक कामांमध्ये मतभेद निर्माण झाले परंतु मनोभेद कधीही झाले नाहीत. या शहराला संतांचे आशीर्वाद आहेत. देहू, आळंदी आणि चिंचवड या संतांच्या भूमीमध्ये काम करत असताना खूप काही शिकावयास मिळाले. संतांची शिकवण इथल्या जनमानसात रुजलेली आहे. येथील राजकीय नेतृत्व देखील गावकी-भावकीमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना निश्चितच आपण जास्तीत जास्त चांगले काम करू शकलो असेही शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळते आयुक्त शेखर सिंह यांचा आज नागरिक सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांच्या हस्ते शेखर सिंह व त्यांच्या पत्नी उषा सिंह यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, हनुमंतराव गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संदीप जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, संदिप वाघेरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त आण्णा बोदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवना समाजाचे संपादक नाना कांबळे यांनी केले.
या नागरी सत्कारापूर्वी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने एका मुलाखतीचाही कार्यक्रम झाला. या मुलाखतीच्या वेळी बोलताना शहरातील कामे आणि त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न या सर्वांचा शेखर सिंह यांनी मागोवा घेतला. आपल्या वैयक्तिक जीवनाचा मागोवा घेताना त्यांनी सांगितले की, उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलो होतो. त्याचवेळी जे काही करायचे ते आपल्या देशातच करावयाचे हे ठरवून परत भारतात आलो.
शिरिश प्रभुणे यांनी आपल्या भाषणात शेखर सिंह यांच्या कार्याची प्रशंसा केली. जमिनीवर काम करणारा अधिकारी म्हणुन शेखरसिंह यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मोजकेच दोन-तीन असे आयुक्त या शहराला लाभले. त्यांच्यातीलच एक म्हणजे शेखरसिंह. आजवर येथील एकाही आयुक्तांचा नागरी सत्कार झालेला नाही. याच सर्वकाही आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आ. शंकर जगताप, उद्योजक कृष्णकुमार गोयल, भाऊसाहेब भोईर आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अतुल क्षीरसागर यांनी केले
Please follow and like us:
