नवी दिल्ली
एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले.
‘मन की बात‘ या कार्यक्रमात व ‘संसदेत‘ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लिखित केलेल्या सुभाषितांचे तसेच सूक्तींचे संकलन पुस्तक रूपाने संस्कृतभारतीच्या (विदर्भ) न्यासाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे “उद्गारा:”. संस्कृतभारतीच्या पुणे येथील कार्यकर्त्या सौ. वैखरी कुलकर्णी (सेनाड) व सौ. रञ्जना फडणीस यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकात श्रीयुत् मोदीजींनी उद्धृत केलेल्या सुभाषितांचे तसेच सूक्तींचे पदच्छेद व अन्वयासह संस्कृत, हिंदी, मराठी व इंग्रजी अर्थ दिलेले आहेत. सुभाषितांचा स्रोत लिहिला आहे. सोबतच सुभाषिताशी सम्बन्धित पारंपारिक अथवा ऐतिहासिक कथा निरूपित केली आहे. कुठल्या संदर्भात सुभाषित ऐकविले, तो संदर्भ माननीय मोदींच्या शब्दात लिहिला आहे. लेखिकांच्या टिप्पण्यांमुळे सुभाषितांबद्दल अतिरिक्त माहिती वाचकाला प्राप्त होणार आहे. एवढेच नाही तर श्रीमती पल्लवी पंडित यांनी काढलेल्या शंभरावर चित्रांमुळे सुभाषितांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. रंगीत चित्रांमुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरणार आहे.
संस्कृतभारती (विदर्भ) न्यासातर्फे हे पुस्तक सन्माननीय पंतप्रधानांना भेट देण्यासाठी न्यासाचे पदाधिकारी, तसेच संकलनाकर्त्या दिल्ली येथे गेल्या होत्या. आदरणीय प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी हा समर्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्कृतभारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा. श्रीशजी देवपुजारी उपस्थित होते. श्रीश देवपुजारी यांनी दोन तप (२४ वर्ष) सत्तेच्या केन्द्र स्थानी राहून देशसेवा केल्याबद्दल पूर्वप्रचारक मोदीजींचा अंगवस्त्र देऊन सत्कार केला.
या प्रसंगी बोलताना श्रीमान् मोदीजी म्हणाले की भाषणात सुभाषिते वापरण्याची प्रेरणा मला प.पू. सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरसांकडून मिळाली. ते सुयोग्य सुभाषितांचा उपयोग करून विषय समजावीत असत. काही काळापूर्वी संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती. संस्कृतभारतीने ती सुलभरीत्या सर्वत्र पसरविली, असा अभिप्रायही श्रीमान् नरेन्द्र मोदी यांनी दिला.
पुस्तक भेट देतांना, सौ. वैखरी कुलकर्णी (सेनाड), सौ. रञ्जना फडणीस, सौ. वंदना देशपांडे, कुमारी श्रीया कुलकर्णी, श्रीश देवपुजारी, साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी, अभिजीत टेणी, श्रीनिवास वर्णेकर, डॉ. दिलीप सेनाड, प्रमोद देशपांडे ही मंडळी उपस्थित होती.
उपस्थित प्रत्येकाची ओळख करून घेऊन मोदीजींनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली. त्यातच ते पुढे म्हणाले – “जिज्ञासा असेल, तर कृती घडते, जिज्ञाेसा जागी झाली पाहिजे.”
सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारतांना संघप्रचारकाचा व्यवहार अजून कायम आहे हे जाणवले. मंत्रमुग्ध करणारा असा हा कार्यक्रम होता. हे क्षण म्हणजे आयुष्यभराची ठेव आहे, असा अनुभव प्रत्येकाला आला.
नोव्हेंबर महिन्यात कोईम्बतूर येथे होणाऱ्या संस्कृतभारतीच्या अखिल भारतीय संमेलनात या पुस्तकाचे लोकार्पण झाल्यानंतर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध होईल. मा. नरेंद्रजी मोदी यांनीही या अखिल भारतीय संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
