44
मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाची आढावा बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, आयटीआयमार्फत राबविले जाणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे अंमलात आणावेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ लक्षात घेऊन त्याला अनुरुप अभ्यासक्रम प्रशिक्षणात समाविष्ट करावेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबतच खासगी औद्योगिक प्रशिक्षणासाठी सक्षम आणि सुसज्ज यंत्रणा उभारावी. तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा ‘सीएम डॅशबोर्ड’वर नियमितपणे घेण्यात यावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परदेशात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन विभागाने काळानुरूप आवश्यक अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगारवाढीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली जावी. कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून ते अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवून तिचे परीक्षण व्हावे. शासकीय आयटीआयचे जागतिक दर्जाच्या कौशल्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात तसेच ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) कडून मार्गदर्शनही घ्यावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
Please follow and like us:
