33
नाशिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आज नाशिक येथे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) च्या रिजनल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उदघाटन व कोनशिला अनावरण झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात विद्युत उपकरणांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेची मागणी अनेक वर्षांपासून होती. पूर्वी उद्योगांना तपासणीसाठी हैद्राबाद किंवा भोपाळला जावे लागत होते, त्यामुळे गुंतवणुकीवर मर्यादा येत होत्या. आता नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने राज्यातील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र देशात इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यादृष्टीने राज्यात ईव्ही टेस्टिंग फॅसिलिटी निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहे. महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली असून गेल्या 3 वर्षांत 45,000 मेगावॅट क्षमतेची निर्मिती करण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्याने 2035 पर्यंतचे संपूर्ण नियोजन आखले असून, या माध्यमातून ₹2 लाख कोटींची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात होत आहे. हरित ऊर्जा निर्मिती, विश्वासार्ह वितरण जाळे उभारणे आणि उद्योगांना कमी दरात स्थिर वीज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. 2025 ते 2030 दरम्यान वीजदर दरवर्षी 2% ने कमी करण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासावरही प्रकाश टाकला. गेल्या 6 महिन्यांत 7 मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली असून खाणकाम उपकरण निर्मितीचे नवे केंद्र येथे उभे राहणार आहे. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराशी जोडल्यामुळे नाशिक ‘उद्योगाचे जंक्शन’ म्हणून वेगाने विकसित होईल.
Please follow and like us:
