Home पिंपरी चिंचवड हिंजवडीसह सात गावे महापालिकेत घेण्याची हीच योग्य वेळ

हिंजवडीसह सात गावे महापालिकेत घेण्याची हीच योग्य वेळ

 खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे मागणी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित  असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिका घेण्याची हीच योग्य वेळ आहे. या गावांमध्ये नियोजनबद्ध विकास होत नाही, बकालपणा वाढत आहे. अनधिकृत बांधकामे वाढत असून नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. त्यामुळे हिंजवडीतील रस्ते जलमय होत आहेत. त्यासाठी  निवडणुकीपूर्वी ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्यावीत अशी मागणी  मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी, मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत. या भागात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असून वळविले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडी जलमय झाली. नदीलाही गटारीचे स्वरूप आले आहे. या गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. बांधकामावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे या परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूक कोंडी, विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत. हिंजवडी नाशिक फाटा  ते चाकण अशी मेट्रो होणार आहे. या भागाचा विकास होत आहे. त्यामुळे ही गावे तत्काळ महापालिकेत घेणे गरजेचे आहे.

हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागत आयटी पार्क आहे. देशभरातील नागरीक येथे येतात. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे. गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे यां गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

महापालिका निवडणुकीपूर्वी गावे  महापालिकेत घ्या

महापालिका निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्यास वेळ आहे. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणूका होतील असे दिसते. त्यामुळे प्रभाग रचना होण्यापूर्वी गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा. जेणेकरून या गावासह प्रभाग रचना करता येईल. निवडणुकीत नगरसेवक निवडून येतील. ही गावे महापालिकेत आल्यास नियोजनबद्ध विकास करणे सोईचे होईल, असेही खासदार बारणे म्हणाले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00