Home पुणे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची-  देवेंद्र फडणवीस

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची-  देवेंद्र फडणवीस

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा भांडारकर संस्था लॉ कॉलेज रोड येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, केंद्राचे विश्वस्त व प्रमुख विनय खटावकर, सचिव राजेंद्र जोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करून आणि सेवा आणि समर्पण हा भाव ठेऊन दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा एक नवीन जागतिक विक्रम तयार केला. सेवेचाच भाव ठेऊन काम करणाऱ्यांसाठी विक्रम बनवावा लागत नाही तर तो एक विसावा असून हा प्रवास कधीच थांबत नाही. हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने या केंद्राचे नाव दिव्यांग पुनर्वसन केंद्र करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषतः आर्टिफिशियल लिम्ब्ज मनुफॅक्चरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया (अलिम्को) स्थापन केल्यामुळे पूर्वी जे अत्याधुनिक कृत्रिम अवयव (प्रोस्थेटिक पार्ट्स) आयात करावे लागत होते; ते तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतात आणल्याने जागतिक गुणवत्तेचे कृत्रिम अवयव आपल्या देशात तयार होत आहेत. मोठ्या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, असे देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

राज्यातील शासकीय कार्यालये, संकेतस्थळे या सर्व ठिकाणी सुगमता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 100 दिवसांच्या कार्य आराखड्यामध्ये दिव्यांगांकरिता सुगमता निर्माण करणे हेदेखील लक्ष्य दिले आहे, अशी माहिती देखील श्री. फडणवीस यांनी दिली.

श्री. चितळे यांनी माहिती दिली. या विक्रमात दिव्यांगांना ८ तासात ८९२ अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृत्रिम हात, पाय अवयव बसविण्यात आले. संस्थेला या कार्यासाठी आर्थिक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येतात. सेवेतून चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. ढोले पाटील, श्री. खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक स्वप्नील डांगरेकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी जागतिक विक्रमाबाबत माहितीची चित्रफित दाखविण्यात आली. प्रायोजक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00