Home पिंपरी चिंचवड सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव व्ही. राधा

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव व्ही. राधा

100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत घेतला विविध विभागांच्या कामांचा आढावा

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

पुणे जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून प्रचंड क्षमता असलेला जिल्हा आहे. येथील अधिकारी विकासाचा दृष्टीकोन असलेले असून विविध विभागांनी आपल्या ॲप, पोर्टल तसेच ऑनलाईन यंत्रणांचे एकत्रिकरण कसे करता येईल, सर्वसामान्याचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्यांवर सहजासहजी तोडगा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही. राधा यांनी दिले.

विधानभवन येथे 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रभारी अतिरिक्त आयुक्त समिक्षा चंद्राकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

जिल्ह्याला ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेनुसार विकसित कसे करता येईल हा दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे, असे सांगून श्रीमती राधा म्हणाल्या, विविध विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय राखत दूरचा विचार करुन शाश्वत कामे होतील यासाठी प्रयत्न करावेत. हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून अजूनही त्याला मोठी चालना देता येऊ शकते. त्यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, इतर देशातील, राज्यातील कार्यप्रणालींचा अभ्यास करण्यात यावा. उद्योगांना हा जिल्हा ‘व्यवसाय स्नेही’ असल्याचा विश्वास अधिक वाढीस लागेल, असे प्रयत्न व्हावेत.

त्या पुढे म्हणाल्या, येथे पर्यटनक्षेत्रांचा चांगला विकास झालेला आहे. तथापि, जिल्ह्यात आलेला पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेट देत तीन-चार दिवस जिल्ह्यातच कसा राहील यादृष्टीने सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करावा, जेणेकरुन महसूलवृद्धीसह स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी पर्यटन व्यवसायिकांची बैठक घेऊनही त्यांचा सूचना जाणून घ्याव्यात.

जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद  आदींनी आपल्या सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने तसेच आपसात समन्वय राखण्यासाठी एकच व्यासपीठ अर्थात ऑनलाईन यंत्रणा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.

केवळ कोणत्याही समस्या न मांडता त्याबाबत उपाययोजना सुचविणे आणि शासनाकडून नेमके काय अपेक्षित आहे हे योग्य तऱ्हेने संबंधित विभागाकडे मांडल्यास समस्या अधिक गतीने सुटतात. पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाणी बचत, योग्य प्रमाणात वापर, पुनर्प्रकिया करुन वापर आदींवर उपाययोजनांचे आराखडे तयार करावेत. नदी, नाले आदी पाणी संरचना स्वच्छ कशा होतील यासाठीचे आराखडे तयार करुन अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विविध विभागांच्यावतीने चाललेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून तसेच विभागस्तरावर विविध विभागांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याने कामातील समस्या तातडीने सोडविता येऊन कामे मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी 100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डूडी यांनी ई-ऑफीस, महा-महसूल, ई-हक्क, ई-चावडी, दृकश्राव्य माध्यमांद्वारे सुनावणी, सेवादूत मोबाईल ॲप्लिकेशन व प्रणाली, पुनर्वसन संकेतस्थळ, मैत्री ॲप, गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी प्रणाली, कार्यालयांचे अभिलेख संगणकीकरण, विविध किल्ल्यांचे जतन व संवर्धनाचे काम, युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये समावेश आदींबाबत माहिती देऊन जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.

मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी समान पाणीपुरवठा योजना, शहराशी जोडलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची संकल्पना, वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी विविध पूल, तुटक (मिसींग) रस्त्यांबाबतचा आराखडा, कात्रज कोंढवा रस्त्याचे कामाची प्रगती, पुणे विमानतळ ते राजभवन रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्याबाबतचा आराखडा, महत्त्वाच्या खराब झालेल्या रस्त्यांचे मिशन 15 दिवस अंतर्गत संपूर्ण डांबरीकरण पूर्ण करणे, जायका प्रकल्पाची प्रगती, मुळा- मुठा नदीसुधार प्रक्लप आदींबाबत सादरीकरण केले.

मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना, अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक व्यवस्थापन व संनियंत्रण, कचरा गाड्यांचे जीपीएसद्वारे संनियत्रण, नागरिकांना सेवा पुरविणासाठी सारथी प्रणाली, पवना, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प आदी तसेच भविष्यातील प्रकल्प आदींबाबत सादरीकरण केले.

श्री. म्हसे यांनी आपल्या सादरीकरणात पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प, नियोजित बाह्य वर्तुळ मार्ग, पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक स्थापना आदींबाबत माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या 303 केंद्रस्तरीय प्राथमिक शाळांचा सर्वंकष विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पाणशेत प्रमाणेच समूह शाळा प्रकल्पही राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्री. बहीर यांनी सार्वजनिक विभागामार्फत जिल्ह्यात बांधकाम करण्यात आलेल्या विविध इमारतींचे, सुरू असलेल्या प्रकल्पांचे तसेच आगामी 100 दिवसाचे नियोजनाबाबत सादरीकरण केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00