पिंपरी
मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील व्यक्तींचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला. पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानावर हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या हेतूने दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. यानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मैत्री पुस्तकांशी, मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल साहित्य संमेलन, मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील सोपान खुडे, सुरेखा कटारिया, नंदकुमार मुरडे, बाळकृष्ण माडगुळकर, संदीप तापकीर, डॉ.धनंजय भिसे, संदीप राक्षे, संजय पवार, अरुण बोऱ्हाडे, देवेंद्र गावडे आदींचा यावेळी
सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण, गायकवाड, कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,
दिव्यांग भवन फाऊंडेशनचे कार्यकारी अधिकारी परेश गांधी, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनी गौरवमूर्तींना देण्यात आली भारतीय संविधानाची प्रत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत असून मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करताना त्यांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. याशिवाय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी संघर्षाची माहिती देणारे जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तकही यावेळी देण्यात आले.
महापालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जात आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करताना मराठी भाषेतील संवाद अधिक वाढावा तसेच सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. या पंधऱवड्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मराठी भाषेचा प्रचार प्रसार करत मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा
गौरव केला जात आहे.
किरण गायकवाड, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
