52
खडकी
मुलांमधील संशोधक वृत्ती वाढविण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विज्ञान प्रदर्शन म्हणजे मुलांच्या संशोधनवृत्तीला चालना असते. यातूनच उद्याचे संशोधक जगाला मिळत असतात. मुलांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन मुलांना अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या पुढील काळात अधिकाधिक मुलांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. डॉ
भाऊसाहेब कारेकर यांनी केले.
सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल खडकी येथे आयोजित केलेल्या 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
याप्रसंगी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. महेश शेंडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती माननीय नाना शिवले, विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे, सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल खडकीचे मुख्याध्यापक मा. रेव्हरंड फादर डेनिस जोसेफ, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड, सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कारेकर पुढे म्हणाले की, प्रकल्पांची पुनरावृत्ती विद्यार्थ्यांनी टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, खडकीचे मुख्याध्यापक मा. रेव्हरंड फादर डेनिस जोसेफ यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी बोलताना त्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्देशाविषयी विवेचन केले आणि महाराष्ट्र या देशाला एक महान शास्त्रज्ञ मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. महेश शेंडकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही समस्येचे मूळ शोधण्यासाठी संशोधन महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन केले. तसेच दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या विज्ञान दिनाचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
नाना शिवले म्हणाले की , मुलांमधल्या क्षमतांचे दर्शन या विज्ञान प्रदर्शनाने घडवले. तसेच या पुण्यनगरीने अध्यात्माला विज्ञानाची जोड देण्याचे कार्य केले आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रकल्पात सहभागी झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना चषक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली . तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
प्रत्यूष माने, सर्वेश लावंडे, कल्याणी कदम, मृण्मयी धुमाळ, मृणाल कोळेकर, राज काळभोर, पियुष कांबळे, प्राप्ती जंगम, शिवलाल यादव, सोहम नलावडे, सागर खैरमोडे, संतोष देशमाने, सचिन सोंडकर या विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवडले गेले आहेत.
प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रदर्शनाचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, खडकी येथील शिक्षक श्री.सिरील भोसले आणि श्री. आदित्य साळवी यांनी केले. विज्ञान पर्यवेक्षक मा. विराज खराटे यांनी आभार मानले.
Please follow and like us:
