Home पुणे शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, शिक्षण संचालक माध्यमिक संपत गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कृती कार्यक्रम आखून राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवावे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा, भेटीदरम्यान स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आदी भौतिक सुविधांसोबत अभ्यासक्रमावरही लक्ष केंद्रीत करावे. शाळेतील भौतिक सुविधांबाबत राज्यस्तरीय आराखडा तयार करावा, याकरीता आवश्यकतेनुसार सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात. याकामी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घ्यावी. अधिकाऱ्यांनी एक शाळा दत्तक घेण्याबाबत नियोजन करावे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत, त्यादृष्टीने नियोजन करावे.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, क्रीडा अशा गुणांचा विकास झाला पाहिजे, याकरीता विभागनिहाय शाळेबाबत नियोजन करावे. तालुकास्तरावर इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशी एखादी आदर्श शाळा निर्माण करा, त्यामध्ये वाचनालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणकीकृत वर्ग, क्रीडांगण, खेळाचे साहित्य आदींचा समावेश करावा. शालेय प्रवेश प्रक्रियेत पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये, शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आहार द्यावा, विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, आजाराचे निदान होईपर्यंत त्याला मदत करावी, असेही ते म्हणाले.

विविध जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्याबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकाला प्रोत्साहान देण्यात यावे, शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. आदर्श शिक्षकांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा इतर ठिकाणाही उपयोग करुन घ्यावा.  शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक वेळेत मिळेल यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षक भरती प्रक्रियेला गती द्यावी. शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल घडविण्याच्या कार्यात पालक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सीबीएसई पॅटर्नच्या शाळेकरीता प्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रगीतानंतर राज्य गीताचे गायन होईल, याबाबत दक्षता घ्यावी. कामकाज करताना त्रुटी राहिल्यास त्याची पूर्तता करुन पुढील कामाचे नियोजन करावे.

श्री. भुसे यांच्या हस्ते शिक्षण आयुक्तालयाच्या ‘दिशादर्शिका वर्ष 2025’ चे अनावरण करण्यात आले.

श्री. सिंह म्हणाले. आगामी काळात शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विभागाचा भर आहे.  शिक्षकांना शैक्षणिक कार्यात सहभागी करुन शालेय पातळीवर गुणात्मक परिवर्तन घडविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. सिंह म्हणाले.

श्री. गोसावी यांनी प्राथमिक विभाग, श्री. सूर्यवंशी यांनी माध्यमिक विभाग आणि श्री. पालकर यांनी योजना विभागाचा आढावा यावेळी सादर केला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00