88
पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी या परिसराला चिखली पोलीस स्टेशनची हद्द लागू करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदनामध्ये केशव घोळवे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी हा परिसर येत असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, मंदिरे, क्रीडांगणे, उद्याने, बीआरटीएस रोड, बर्ड व्हॅली उद्यान तसेच औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
येथील निवासी भागात राहत असलेल्या नागरिकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भागात भरधाव वेगाने व कर्कश आवाजाने दुचाकी चालवणे, महिला भगिनींच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन जाणे तसेच काही टोळक्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी अशा अनेक घटनांना या परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
हा परिसर दुर्दैवाने येथून पाच किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असल्याने अशा घटनांची तक्रार पोलिसांकडे देण्यास विलंब लागत आहे. संभाजीनगरचा परिसर हा निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत यमुना नगर पोलीस चौकीच्या हद्दीत येत आहे. या परिसरापासून हे अंतर चार किलोमीटर पेक्षा अधिक असल्याने येथील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक व पोलीस या दोघांच्या दृष्टीने भौगोलिक दृष्ट्या योग्य असलेल्या व तत्पर सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने हा परिसर येथून फक्त पाचशे मीटर अंतरावर असलेल्या चिखली पोलीस स्टेशन मध्ये समाविष्ट करण्यात यावा व येथील नागरिकांची होणारी गैरसोय थांबवून योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी केशव घोळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे
Please follow and like us:
