मुंबई
विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी याबाबतचा ठराव मांडला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
हा ठराव मांडताना श्री. शेलार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असे वाटू लागले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेतृत्वावर असभ्य भाषेत टीका करणे सुरु केले होते. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर, फडणवीस यांच्या कुटुंबियांवर एकेरी, गलिच्छ भाषेत टीका केली होती. विरोधकांच्या अपप्रचाराला मतदारांनी केराची टोपली दाखवली.
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी विरोधकांनी शहरी नक्षलवाद्यांचीही मदत घेतली. अशा महाविकास आघाडीला तिची योग्य जागा दाखविल्याबद्दल भाजपा मतदारांचे आभार मानते, असेही श्री. शेलार यांनी ठराव मांडताना नमूद केले.
संघटन पर्व अभियानाबाबत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
त्या पूर्वी ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य उपस्थित मान्यवरांचा अहिल्यानगर जिल्ह्यातर्फे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजी कर्डीले, आ. मोनिका राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
