उरण
उरण नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढत असताना ईव्हीएम मशिन्स व मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमवर सुरक्षेचा लोखंडी कवच चढविण्यात आला आहे. प्रशासकीय भवनातील सभागृहासह नगरपालिका कार्यालय परिसरात पोलिसांनी अक्षरशः कडेकोट बंदोबस्त उभा करत ‘नो-एरर झोन’ घोषित केला आहे. निवडणूक प्रक्रियेत कुठलाही संशयास्पद हालचाल, हस्तक्षेप किंवा गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासन कोठलीही जोखीम घ्यायला तयार नाही. संपूर्ण परिसरात दिवसरात्र पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात असून प्रवेशद्वारावर कडक तपासणी सुरू आहे. सुरक्षा रिंगणात घाटलेल्या अधिकार्यांनी स्ट्राँगरूमची पाहणी करत सर्व यंत्रणा सतत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासकीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्ट्राँगरूममधील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले. कोणताही दोष, गडबड किंवा शंका राहू नये म्हणून सुरक्षा तपासण्या वारंवार केल्या जात आहेत. स्ट्राँगरूम परिसरात 24 तास सीसीटीव्ही देखरेख, आधुनिक अलार्म सिस्टम, ड्युअल लॉकिंग सिस्टीम व तांत्रिक निगराणी बसवण्यात आली आहे.अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याच्या सूचना देत संपूर्ण परिसरात अग्निसुरक्षेची व्यवस्था उभारण्यात आली आहे. निवडणूक साहित्य ठेवण्यात आलेल्या उरण नगरपालिका कार्यालयालाही हाय-रिस्क झोन घोषित करून अतिरिक्त पोलिस बळ तैनात केले आहे.
