Home पुणे भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

तळेगाव दाभाडे येथे अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात उलगडला भटके-विमुक्तांचा अनुभवसिद्ध ज्ञानकोश

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
तळेगाव दाभाडे
भटके-विमुक्त समाज हा भारतातील अनुभवसिद्ध ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीत, श्रमात, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखं सखोल ज्ञान आहे. प्रत्येक जातीचा इतिहास लिहिला तर ज्ञानाची शेकडो उपनिषदे लिहिता येतील,” असे ठाम मत ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक प्रवासाची प्रकट मुलाखत घेतली. संवादात प्रभुणे यांनी आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा विस्तृत पट उलगडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, तळेगाव शहर संघचालक विक्रम दाभाडे ,सामाजिक समरसता मंचाचे डाॅ.सुनिल भंडगे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी उपस्थित होते.
असीधारा साप्ताहिकापासून ग्रामायनपर्यंत…
प्रभुणे यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ‘असीधारा’ नावाचं सामाजिक साप्ताहिक सुरू केलं होतं. बदलत्या काळात आणि तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून न घेतल्यामुळे साप्ताहिक बंद करावं लागलं. त्या साप्ताहिकावर साडेतीन लाखांचं कर्ज झालं होतं – जे पुढे पत्नीने फेडलं.
यानंतर त्यांनी ‘माणूस’ मासिकात माजगावकरांसोबत काम सुरू केलं, अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या. ‘ग्रामायन’ विशेषांकात त्यांनी १०० पानी लेखन एकहाती केलं. गावात वास्तव्यास राहून २५ वर्षांत एकही लग्न न झालेल्या गावातील अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला. याच विशेषांकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आणि त्याचे इंग्रजी भाषांतर होऊन युनेस्कोपर्यंत पोहोचले. शरद जोशी, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद घडला. पुलंनी त्या लेखाचा “लेखक कोण?” म्हणून चौकशी करून थेट ५,००० रुपयांचं बक्षीस दिलं – हे त्यांनी विशेष आठवणीने सांगितलं.
संघाचा चष्मा बाजूला ठेवून माणूस पाहिला
“मी प्रचारक होतो, तुकाराम जाधव नावाचा कार्यकर्ता विस्तारक होता. जनावरांसाठी चारा, स्वयंपाकासाठी सरपण गोळा करून तो गावातील माणसांना शिकवायचा. त्यानं मला संघ शिकवला,” असं त्यांनी सांगितलं. “घाटकोपर, रमाबाई नगरच्या बौद्ध वस्तीतही सहा महिने राहिलो. ‘खेड्याकडे चला’ हे बरेचदा पटत नसे,” असेही ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचून त्यांची भूमिका समजून घेतली. बुद्धवंदना घेऊन लोकांना बाबासाहेबांचे विचार समजावले. निमगाव म्हाळुंगीत १५ कुटुंबं परत आणली. सर्वांना बरोबर घेऊन ते गाव हिरवंगार केलं.
अस्पृश्यतेची तीव्रता अनुभवली. “त्याकाळी या लोकांचा स्पर्शही अवघड होता, सावली जाईल तर अपवित्र समजली जायची,” असे त्यांनी सांगितले.
भटके-विमुक्तांच्या ‘प्रथम वसना’चा प्रवास
प्रभुणे यांनी सांगितलं की, त्यांनी फासेपारधी, नंदीबैलवाले, मरीआई पूजक, गोंधळी आदी समाजांसाठी १९९३ ते २००४ या काळात काम केलं. गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी पोलीस स्टेशनचे हेलपाटे खावे लागले. लहान मुलं भुकेने हॉटेलमधून चोऱ्या करत. त्यांना वळण लावण्यासाठी शाखा सुरू केली. शाळेची गरज ओळखून एक वर्षाने ‘यमगरवाडी’ वसतिगृह सुरू केलं.
तुळजापूरजवळ जमीन मिळाली. भिकू इदाते, रमेश पतंगे यांच्या उपस्थितीत भटक्या-विमुक्तांचा मोठा मेळावा झाला. “किती जण येतील? १०-१५?” – असा प्रश्न होता; पण १५०० जण आले. वसतिगृहासाठी २५ मुलांची निवड करताना ‘जास्तीत जास्त अन्याय झालेली’ मुलं घेण्याचं धोरण ठरवलं. पहिल्याच दिवशी १०० मुले आली. ही मुलं दहा-दहा चपात्या खायची – इतकी उपाशी होती.
नव्या शिक्षणाची समरसता
प्रभुणे यांचा प्रवास यमगरवाडीपासून “समरसता गुरुकुलम्” या सामाजिक शिक्षण प्रकल्पापर्यंत पोहोचतो. पारंपरिक ज्ञान, स्थानिक भाषांची ओळख, वडार समाजाच्या छन्नी-हातोड्याचे कौशल्य, घिसाडी-ओतारी कलेचे इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर, यावर आधारित संशोधक समाज घडवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
“मायक्रोसॉफ्ट मन” म्हणजे सूक्ष्म व संवेदनशील विचारांची खिडकी उघडणं – हे त्यांनी शिकवलं. कानडी, तेलुगू, वाघरी, भिल्ल भाषांमधून पारंपरिक ज्ञान जपणारा हा समाज ‘ज्ञानसम्राट’ आहे, असे प्रभुणे ठामपणे सांगतात.
मेकॉले शिक्षण पद्धतीचा विरोध
“उच्चवर्णीय शिक्षणात टिकतात, पण मागासवर्गातले नाहीत. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भटक्या-विमुक्तांमधली सरस्वती हरवली आहे. त्यांच्याजवळ आपण पोचलं पाहिजे. त्यांचं ज्ञान अनुभवावं लागेल,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं.
धनगर समाजाचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, “लोकर काढून वस्त्र बनवण्याचं कौशल्य असणारी ही जमात आज विस्मरणात गेली आहे. त्यांनी लावलेले असंख्य शोध, तांत्रिक कौशल्य, जगण्याचं तत्त्वज्ञान – हे सर्व पुन्हा शोधलं पाहिजे. भटक्या-विमुक्तांचा भारत हे ज्ञानाचं खजिनं आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गणेश वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश गंगाधर कुलकर्णी, चिटणीस प्रीतम भेगडे आणि ग्रंथपाल विनया अत्रे ,कार्यक्रम प्रमुख यतीन शहा तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षक, अभ्यासक, कार्यकर्त्यांनी प्रभुणेंच्या अनुभवातून प्रेरणा घेतली. “बैठका जास्त झाल्या की कंटाळा येतो,” असं सांगणाऱ्या या थेट माणसाशी भिडणाऱ्या समाजसेवकाने “प्रथम वसन करा, मग पुनर्वसन” ही भूमिका जगून दाखवली आहे.
संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय हर्षल गुजर यांनी करून दिला. अविनाश राऊत यांनी आभार मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00