Home पुणे आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

  पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, नानासाहेब जाधव, रविंद्र वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्ये, उत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला.  त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केली, असे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे २१ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने शिवसृष्टीला ‘मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये ३६ मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणाले, देशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचना, पाण्याच व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, किल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   ते म्हणाले, शिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

  प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालन, गंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

   कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00