Home पिंपरी चिंचवड आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद

आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

  “आयुष्यावर बोलू काही” या  अनोख्या  संगीतमय आणि काव्यसमृद्ध कार्यक्रमाच्या  सादरीकरणातून उमटलेली सृजनशीलता, प्रेमळ संवाद आणि कलात्मक दृष्टिकोनाने प्रेक्षकांच्या हृदयात अमिट ठसा उमटवला. कवी संदीप खरे आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी  जीवन, आशा आणि संघर्ष यांच्या भावनात्मक अनुभूतींना स्पर्श करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.  रसिक  प्रेक्षकांनी देखील या मैफिलीला जोरदार प्रतिसाद देत उत्कृष्ट दाद दिली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाच दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज शाळेजवळ सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या संगीतमय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास  माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, साई किरण मित्र मंडळाचे कुशाग्र कदम, गौरव कदम, नितीन नागूल, विशाल नारखेडे, रमेश जोशी, विलास फणसे, कल्पेश हरणे, अजित कडोलकर, संतोष वऱ्हाडी, संजय कलागते, प्रवीण यादव, निलेश नारखेडे, गिरीश तेलंग, मंगेश गुंजाळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रख्यात कवी संदीप खरे आणि मनमोहक गायन कौशल्य असलेले सलील कुलकर्णी यांनी एकत्र येऊन रसिकांसमोर मनोहर गाण्यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच जीवनातील विविध पैलूंना शब्दरूप दिले. कवी संदीप खरे यांनी आपल्या सहज आणि प्रभावी शब्दांनी गाण्यांना नवीन अर्थ प्राप्त करून दिला, तर डॉ. सलील कुलकर्णी यांच्या सुरांनी प्रत्येक गीताला जिवंतपणा आणला. आयुष्यावर बोलू काही” हा कार्यक्रम जीवनातील प्रत्येक क्षणाची कदर करण्याचा, आशा आणि उमेद जागविण्याचा संदेश देणारा एक सामाजिक व सांस्कृतिक अनुभव ठरला. या कार्यक्रमाने कला आणि शब्दाच्या माध्यमातून जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवले आणि प्रेक्षकांना आत्मिक समृद्धीचा अनुभव दिला.

कार्यक्रमातील खास सादरीकरण

 “मी हजार चिंतांनी डोके खाजवतो, तो काट्यावर बसूनही शीळ वाजवतो.” या गाण्यातून  चिंतनाच्या ओझ्याला आणि जीवनातील धैर्य व हास्य यांना एकत्र उलगडले गेले.

दमलेल्या बाबाची कहाणी” या गाण्यातून कामामुळे आपल्या मुलीला वेळ न देऊ शकलेल्या वडिलांची कहाणी विषद केली आहे. वडील आणि मुलगी यांच्या नात्यातील गोडवा यातून आपल्याला दिसून येतो.

 “गुलाबाची फुलं दोन” या गाण्यातून  प्रेम, सौंदर्य आणि ताजेतवानेपणाच्या भावनांचा संगम या  प्रभावीपणे मांडला गेला.

चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही” या गाण्याने  मैत्री आणि एकोपा यांच्या गोड संवादाने रसिकांच्या मनाला आनंदाने भरून टाकले.

 “राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का” यातून प्रेमळ संवाद आणि आत्मीयतेचे गोड क्षण  उलगडले गेले.

मन तळ्यात मन मळ्यात”  हे गाणे प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळ्याचे अनमोल भाव व्यक्त करते. सादरीकरणादरम्यान कलाकारांनी शब्द आणि सुरांचा अद्भुत संगम साधला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक विलक्षण भावनिक उर्जा निर्माण झाली.

नसतेस तू जेव्हा घरी “ या  गाण्यातून  एकाकीपणा, अधीरता आणि आयुष्याच्या संघर्षांची अनोखी कहाणी सांगितली गेली. कवींच्या मनोवेधक अभिव्यक्ती आणि गायकांच्या सुरांच्या  अनन्य मिश्रणाने प्रेक्षकांना एका नवीन जगात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

कविता आणि संगीताचा विलक्षण संगम आणि प्रेक्षकांचा उत्साह

कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आणि जीवनाच्या विविध अनुभवांना नव्याने उजाळा दिला. तसेच संपूर्ण कार्यक्रमात प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद देत उत्कृष्ट दाद दिली. प्रेक्षकांनी वन्स मोअर करत कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत उत्साहाने कार्यक्रमाची ऊर्जा दुप्पट झाली. प्रेक्षकांना देखील कलाकारांसोबत गाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00