पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.12) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (1 बीएचके) प्रवर्गातील 47 सदनिका व एलआयजी (2 बीएचके) प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील 347 सदनिका व एलआयजी (1 बीएचके) प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत 3 हजार 271 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 3256 अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित 15 लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत 22 जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
सदनिकांची सोडत बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास वनविभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळ परिषद सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे होणार आहे. अर्जदारांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
