Home पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकामे वतीने निष्कासनाची कारवाई 

अनधिकृत बांधकामे वतीने निष्कासनाची कारवाई 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच या परिसरातील अनधिकृत बांधकामे अशा एकूण २२२ बांधकामावर आज महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि विविध क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूट बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबविली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशासनाला सूचना देखील केल्या.  या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते.  पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही निष्कासन कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कारवाईत सहभागी यंत्रणा

सुमारे ४२ एकर क्षेत्रात झालेल्या या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर  निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते.

शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील  अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. कुदळवाडी भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या तसेच वाहतुक दळणवळणाचे  प्रश्न निर्माण झाले. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या बांधकामांमध्ये सुरक्षात्मक उपाय योजना न करता विविध व्यवसाय सुरू असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. या व्यवसायातून थेट नदीपात्रात  दूषित पाणी सोडले जात होते, त्यामुळे पाणी तसेच हवा प्रदूषणात वाढ झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तरतुदींचे उल्लंघन करणे, कामगार कायद्याचे पालन न करणे अशा अनेक बाबी या भागात निदर्शनास आल्या होत्या. अशा परिस्थितीत कायद्याचे पालन करुन महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे. यापुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील.

 शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00