Home पुणे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा- अजित पवार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

  भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या 75 वर्षात देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली; परंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीला, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटे, आव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून 75 वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटाला, आव्हानाला, एकजुटीनं, निर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.

देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा, सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्याग, बलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेद, मतभेद असले तरी, देशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे, ही भावना गेल्या 75 वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या 75 वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला, राज्यघटनेवरच्या, लोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

देशानं गेल्या 75 वर्षात, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. या प्रगतीचं श्रेय 75 वर्षांच्या काळात, देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जी साथ दिली. त्यांच्या त्या मेहनतीला आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण तसेच अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रोणु मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य, कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत, हे  पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृती, कलासमृद्धीचा गौरव आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने पोलिस-अग्निशमन पदक तसेच सेवापदक व शौर्यपदक तसेच ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात  आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही अभिनंदन केले. ज्या अधिकारी, कर्मचारी बांधवांना, मान्यवरांना आज उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं, त्यांचा हा प्रातिनिधीक सत्कार आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.

यावेळी समाज कल्याण विभागाच्यावतीने पालकमंत्री श्री. पवार यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत  देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महानगरापालिके यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्री. पवार यांच्या हस्ते ॲग्री स्टॅक योजेनाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच ‘पीएमआरडीए’च्या आपत्ती प्रतिसादक दलाकरीता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी उल्लेखनीय सेवेबाबत अपर पोलीस महासंचालनालयाचे तुरुगांधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, तुरंगाधिकारी प्रकाश उकरंडे, सेवानिवृत्त सुभेदार आनंदा हिरवे राष्ट्रपती सुधार सेवा पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबाबत अधीक्षक येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, तुरुंगाधिकारी तानाजी धोत्रे, सुभेदार प्रकाश सातपुते, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाचे तुरुगांधिकारी विजय कांबळे राष्ट्रपती सुधार सेवा पदक प्राप्त झाले असून त्यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. परेड संचलनात पुणे शहर, पुणे जिल्हा ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ 1 ते 5, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 व 2, पुणे लोहमार्ग, राज्य उत्पादन शुल्क, गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग, डायल 112 वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका 108, बालभारती, श्वान पथक, अग्निशमन दल, पीएआरडीए आपत्ती प्रतिसादक दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00