पुणे
पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या मतदान साहित्याचे वितरण चिंचवड ऑटोक्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी समन्वय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र पथकामार्फत करण्यात आले. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतदान २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्य स्वीकृतीचे कामही चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ या ठिकाणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविली आहे.
साहित्य वाटप करण्यासाठी ५५ व स्वीकृतीसाठी ४५ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. २१ टेबलांद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप करण्यात आले. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे इत्यादी साहित्य सुपूर्द करण्यात आले.
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी पोलींग पार्टीसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ७१ बसेस आणि ४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला. मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली असून अग्निशामक दलाचे वाहन, पाण्याचा टॅंकर, शीघ्र कृती दलाचे पथक, वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ९१ हजार ६०७ मतदार असून ३९८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ हजार ७७७ (राखीवसह) अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे २० टक्के मतदान अधिकारी कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या ३९८ मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत तिसरे व अंतिम प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेड (बीईएल) कंपनीचे तज्ञ सोबत असणार आहेत. या बरोबरच दोन शीघ्र कृती दलाची पथके तयार करण्यात आली असून कोणत्याही मतदान केंद्रावरून कॉल आल्यास १० मिनिटांमध्ये शीघ्र कृती दलाचे पथके घटनास्थळी पोहचून मदत करणार आहे. विधानसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी केले आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी वेटलिफ्टिंग हॉल, श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सकाळी ८ वा वाजता सुरु होणार आहे.
मतमोजणी २० फेऱ्यांमध्ये २० टेबलवरुन तर टपाली मतमोजणी ३ टेबलवर होणार आहे. सैनिक मतदान (ETPBS) १ टेबलवर होणार असून मोजणीसाठी ११९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गृहनिर्माण सोसायटी मध्ये घेण्यात आलेल्या मतदान केंद्र (एकूण ६ मतदानकेंद्र) भाग यादी सह दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
मतदारांसाठी केंद्रावरील सोयीसाठी तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांचे मदतीसाठी मतदान केंद्राच्या इमारतीच्या आवारामध्ये दर्शनी भागामध्ये मतदान केंद्राच्या रचनेचा नकाशा लावण्यात आला असून मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याची पाण्याची व्यवस्था, सावली मंडप,रांगेमध्ये आवश्यकतेनुसार बसण्यासाठी बेंच, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व मदतनीस, दिव्यांग, ८५ वर्षावरील मतदारांना त्यांचे शारिरीक क्षमतेनुसार मतदानकेंद्रावर ने-आण करणेसाठी रिक्षा व कर्मचाऱ्यांसाठी वाहन सुविधा, मतदानकेंद्रावर मतदारांचे नाव शोधणेची सुविधा (बी.एल.ओ), मतदारांचे मदतीसाठी एन.सी.सी. व एन.एस.एस. चे स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ८ पेक्षा जास्त मतदान कक्ष असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या सोईसाठी सप्तरंगात कलर कोडींग करण्यात येणार आहे.
मनपा मार्फत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय से. २५, सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी, कमल नयन बजाज हायस्कूल (युनिक), गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल (मॉडेल), हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर हे मतदान केंद्र हरित मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहितीही अर्चना यादव यांनी कळविली आहे.
