35
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हरित कर्जरोख्याच्या माध्यमातून बाजारातून निधी उभा करण्यासाठी परवा पहिले पाऊल उचलले. दोनशे कोटी रुपये किमतीचे हे हरित कर्जरोखे महापालिकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर केले. अवघ्या एक मिनिटांच्या कालावधीत महापालिकेने आपले उद्दिष्ट साध्य करून एक नवा विक्रम स्थापित केला आहे.
शासकीय संस्था आणि त्यांचे कर्जरोखे अशा गोष्टींना बहुदा खुल्या बाजारामध्ये विशेष महत्त्व मिळत नाही. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार विकास कामे करण्यासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांनाही खुल्या बाजारातून निधीची निर्मिती करणे क्रमप्राप्त प्राप्त झाले आहे. राज्यातील कोणत्याच महानगरपालिकेने अशाप्रकारे थेट बाजारातून निधी निर्माण करण्याची संकल्पना राबविलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका अशी आहे की जिने शेअर बाजारामध्ये नामांकन टाकले आहे. शहराच्या पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासासाठी दोन मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. निगडी येथील हरित सेतू प्रकल्प तसेच टेल्को रस्त्यावरील गवळीमाथा ते इंद्रायणी नगर या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी महापालिकेने हे कर्जरोखे उभारले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या कर्जरोख्यांचे शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेल वाजवून रोख्यांचे लिस्टिंग झाल्याचे घोषित केले. यानंतर अवघ्या एक मिनिटांमध्ये 100 कोटी रुपयांचे मूळ भाग विकले गेले. त्याचबरोबर एकूण 513 कोटी रुपयांच्या रोखे खरेदीच्या निविदा प्राप्त झाले आहेत. 

खुला बाजार म्हणजेच खाजगी व्यवस्थापन आणि त्यांच्या कंपन्या यांच्यासाठीचे हे एक मोठे माध्यम आहे. याच माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. या कंपन्यांचे व्यवस्थापन हे खाजगी तत्त्वावर असल्याने तसेच कंपनीच्या कायद्याप्रमाणे येथे निर्माण झालेला नफा हा भागधारकांमध्ये वाटला जात असल्याने अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे येथे पैसा लावत असतात. त्याचे दोन फायदे असतात एक म्हणजे कंपनीला झालेल्या नफ्याचा योग्य तो भाग रोखेदाराला मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भागधारक आपल्याकडील भाग केव्हाही विकून आपल्या अडचणी सोडू शकतात. खाजगी कंपन्या आणि शासकीय यंत्रणा यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे शासकीय कंपन्या किंवा स्वराज्य संस्था कोणतेही काम फायदा कमविणे यासाठी करीत नसतात. गावांचा, शहरांचा विकास करणे, येथील सामान्य जनता तसेच उद्योगधंद्यांना पोषक मूलभूत सुविधा निर्माण करणे यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असते.
त्यामुळे शासकीय यंत्रणेला कोणत्याही कामात काही फायदा मिळू शकेल असे काही नसते. याच मोठ्या फरकामुळे बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडून शासकीय यंत्रणेला विशेष प्रोत्साहन मिळत नसते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हरित रोख्याच्या माध्यमातून खुल्या बाजारात पदार्पण केले. एवढेच नव्हे तर अवघ्या एका मिनिटात उद्दिष्टांची पूर्ती करून शासकीय यंत्रणेवरही गुंतवणूकदारांचा विश्वास आहे हे सिद्ध करून दिले आहे.

कर्जरोख्यांच्या शुभारंभानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महापालिकेचे कौतुक करून अशा प्रकारे कर्जरोखे उभारणारी ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याचा उल्लेख केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच अजित दादा पवार या दोघांनीही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या परिवर्तनवादी कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उमा खापरे, अमित गोरे, महेश दादा लांडगे, शंकर जगताप हे सर्व आमदार उपस्थित होते. त्याचबरोबर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, डॉ.के. गोविंदराज, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, बी एस ई चे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामण राममूर्ती, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक प्रवीण जैन, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ए के कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती मित्तल यांच्यासह महानगरपालिका व मुंबई शेअर बाजारातील मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोख्यांद्वारे निधी उभारण्याचे जे पाऊल उचलले आहे, ते कौतुकास्पद असल्याचे सांगून. महापालिकेने कर्जरोखे इश्यू करताच त्याला गुंतवणूकदारांनी जो प्रतिसाद दिला, तो पाहता शासकीय संस्थांवरील त्यांचा विश्वास स्पष्ट होतो. शहरीकरण झपाट्याने वाढत असताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास साधणे गरजेचे आहे. त्यासाठी हरित कर्ज रोख्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी उभारण्याचे उत्तम उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे. 

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर आनंद व्यक्त करताना सांगितले, पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेली ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणपूरक व हवामानानुकूल नागरी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास पिंपरी चिंचवडच्या शाश्वत भविष्याची पावती आहे. हा निधी केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर हरित विकास घडवण्यासाठी वापरण्याचा महापालिकेचा मानस आहे. यावेळी बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांनीही पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करताना बीएसईच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्तांचा सन्मान
पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड लिस्टिंग’ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा ‘लिस्टिंग सन्मानचिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला. हे सन्मानचिन्ह ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ यांच्या वतीने देण्यात आले.

हरित कर्ज रोख्यांबाबत थोडक्यात
पिंपरी चिंचवड महापालिका ही हरित कर्ज रोख्यांद्वारे निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेच्या या इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच ५.१३ पट अधिक मागणी नोंदवली गेली. उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक टेल्को रस्ता विकास प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन शाश्वत विकास धोरणाचा भाग आहेत. या इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त पतमापन संस्थांकडून एए+ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले असून, ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. व्यवहार सल्लागार व मर्चंट बँकर म्हणून ए. के. कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी काम पाहिले. तसेच परतफेडीची हमी सुनिश्चित करण्यासाठी मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे एस्क्रो खाते तयार करण्यात आले आहे.
Please follow and like us:
