Home पुणे मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार- अजित पवार

मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार- अजित पवार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे

पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे,  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बापुसाहेब पठारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, कायनेटिक ग्रीन कंपनीचे अध्यक्ष सुधांशू अग्रवाल, रितेश मंत्री आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व सोलापूर या आठ शहराचा समावेश करण्यात आला आहे. पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे. या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच समाजातील स्थान बळकट करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. पिंक ई रिक्षा योजनेकरीता २५ हजार रुपये केंद्रशासन आणि ७५ हजार रुपये राज्यशासनाच्यावतीने अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. विविध बँकेच्या माध्यमातून ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महिला वर्गाच्या सुरक्षिततेकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. पिंक ई रिक्षा योजना समाजातील महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे; चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरित्या चालविण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांचीदेखील काळजी घ्यावी. पिंक रिक्षा चालविणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्ररेणास्त्रोत ठरतील, अशा विश्वास व्यक्त श्री. पवार यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राज्यात महिलांच्या उन्नती व बालकांच्या विकासाकरीता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्टया सक्षमीकरणाकरीता महिलांना दीड हजार रुपयांचा ‘सन्मान निधी’ देणारी ‘लाडकी बहीण योजना’आगामी काळातही सुरुच राहणार आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पुणे महानगरपालिकेतील ३८ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील २२अशा एकूण ६० महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात पिंक ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

येत्या काळात पुणे येथे सुमारे एक हजारापेक्षा अधिक ई-वाहन चार्जिंग स्थानक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिंक ई- रिक्षा मेट्रो स्थानके, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांची सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच ओला व उबेर कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात येत आहे. यामुळे महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल, पर्यायाने महिलांना रोजगारही उपलब्ध होईल, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.

उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महिलाच्या अंगी असलेल्या कौशल्याचा वापर करुन त्या विविध क्षेत्रात काम करीत आहे. त्यांना विविध पुरस्कारही मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्य शासनाच्यावतीने महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरीता विविध प्रगतिशील योजना सुरु करण्यात आल्या आहेत. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी पिंक ई-रिक्षा योजना असून महिलांची सुरक्षितता जतन करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. महिला म्हणून मिळालेल्या या संधीचा उपयोग करुन घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीकरीता या रिक्षांचा वापर करण्याबाबत विचार करावा. पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रथमोपचार माहितीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना श्रीमती गोऱ्हे यांनी केले.

यावेळी महिला व बालविकास विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00