पिंपरी

 नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे. अशा प्रकारे सांगितिक कार्य़क्रमातून भारतीय संविधानाला महामानवंदना देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीबद्दल भारतीय संविधानाला सांगितिक महामानवंदना देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या नियंत्रणाखाली ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा दिडशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोंच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. याबाबतची घोषणा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या कार्यकारी अधिकारी प्रिती मेनन यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होत केली. त्यानंतर कलाकारांसह नागरिकांनी उत्स्फुर्तपणे भारतीय संविधानाच्या जयघोष करीत जल्लोष साजरा केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे,   आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, मारूती भापकर, प्रसिद्ध निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या बहुभाषिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत हमको जान से प्यारा है, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, ये मेरा संविधान, अशा विविध गीतांचे गायन विविध राज्यातील बहुभाषिक कलाकारांनी केले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पाली, कोकणी, आसामी, कन्नड, पंजाबी, गुजराती, नेपाळी, मल्याळम, भोजपुरी, बंगाली अशा १५ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनच्या फाऊंडेशनच्या वतीने सांकेतिक भाषेमध्येही संविधानाच्या प्रास्ताविकेचे सादरीकरण करीत भारतीय संविधानाला महामानवंदना दिली. प्रांतिक पोषाख परिधान करून केलेल्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

अशा प्रकारे सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन झालेला हा पहिला कार्यक्रम असल्याने त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाला अनोखी महामानवंदना देण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी केलेला संघर्ष आणि जीवन प्रवास नाट्याविष्काराच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालिन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारतीय संविधानाची प्रत सुपूर्द केली, त्या क्षणाचा प्रसंग देखील यावेळी दाखवण्यात आला. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि यामाध्यमातून उभे राहिलेले सक्षम यशस्वी राष्ट्र याची मांडणी या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक सर्वस्तरातून करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे निवेदक प्रवीणकुमार बनसोडे, पौर्णिमा भोर, सतीश तांदळे यांनी या कार्य़क्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची महती विषद केली.

लोकप्रिय गायकांचा सहभाग

अश्वघोष कला आणि संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय पंजाबी गायिका गिन्नी माही, अंजली बौद्ध, लोकप्रिय गुजराती गायक विशान काथड, भोजपुरी गायक ओंकार प्रिन्स, मल्याळम गायक सिद्धेश, कन्नड गायक नारायणस्वामी यांच्यासह  प्रशांत शिराळे (हिंदी), विजय बनगे (मराठी), ⁠सनी समुद्रे (इंग्रजी), ⁠शफिक मुल्ला (उर्दु), ⁠ममता ठाकूर देसाई (संस्कृत), मार्गेश पाटील (नेपाळी), ⁠पंडित राठोड (कोकणी), सुजीत म्हेत्री (कन्नड), सिद्धराज पाटील (गुजराती) ⁠डॉ. महेंद्र कानडे (पंजाबी), ⁠रणजित शिवशरण (पाली) अशा दिग्गज गायकांसह सुमारे १५० कलाकारांनी सहभाग घेत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने सांकेतिक भाषेसह १६ विविध भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करीत आपल्या संविधानाला विश्वविक्रमी महामानवंदना दिली. या अनोख्या अलौकिक उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचे गौरवगान करणाऱ्या या विश्वविक्रमाने शहराच्या वैभवात भर पडली असून पिंपरी चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गौरविले जात आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे तसेच कार्य़क्रम यशस्वीतेने घडवून आणणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. 

  शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00