स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

पुणे

‘आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ते स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या शर्यतीत धावताना शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपला, तरच मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा ‘स्व’ ओळखून, ध्येय निश्चित करून यशाकडे वाटचाल करावी,’ असे प्रेरणादायी आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘उत्सव तरुणाईचा २०२६’ या विशेष युवा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार अमित गोरखे बोलत होते. यावेळी विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, युवा कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकटाच्या वेळी खऱ्या शक्तीची जाणीव
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी वॉकिंग करताना रील्स पाहणाऱ्या विद्यार्थ्याचे आणि सिंहाच्या पिल्लाचे रंजक उदाहरण देत, संकटाच्या वेळी माणसाला आपल्या खऱ्या शक्तीची जाणीव कशी होते, हे स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुण ओळखून आत्मविश्वास वाढवला पाहिजे, असे ते म्हणाले. आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत त्यांनी नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योग आणि प्राणायाम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शरीर आणि मन दोन्ही सक्षम असेल तरच आव्हानांना सामोरे जाता येते, असे त्यांनी नमूद केले.

राजकारणात येणाऱ्या युवकांसाठी कानमंत्र
युवकांना राजकारणात प्रवेश करायचा असल्यास केवळ सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता शिक्षण, नेतृत्वगुण, समाजाभिमुखता आणि अभ्यासावर भर दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्यक्ष समाजात उतरून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करत त्यांनी शिस्तबद्ध दिनचर्या, कठोर परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.

स्क्रीनवर स्मार्ट दिसण्यापेक्षा विचारांनी स्मार्ट व्हा!
विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीबाबत बोलताना त्यांनी प्रत्येकाने आपल्या आवडीचा विषय ओळखून त्यामध्ये सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. योग्य संगत, सकारात्मक विचार आणि ध्येयाप्रती निष्ठा यामुळेच यशाचा मार्ग सुकर होतो, असे ते म्हणाले. दिशा बदलली तर किनारे आपोआप बदलतात. स्क्रीनवर स्मार्ट दिसण्यापेक्षा विचारांनी स्मार्ट व्हा. मोठी स्वप्ने बघा, योग्य संगत ठेवा, सकारात्मक विचारांनी स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्याने मेहनत करा. यश निश्चित तुमच्या पावलांशी येईल, असे आवाहन यावेळी आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांनी आमदार अमित गोरखे यांच्या विचारांना आणि मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Please follow and like us:

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न 

पिंपरी- चिंचवडमध्ये वीज सुविधा सक्षमीकरणस “बूस्टर डोस”‘