पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारा!

 भाजपा आमदार महेश लांडगे यांना साकडे

पिंपरी-चिंचवड 

पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या संख्येने भटका गोवंश फिरताना दिसतो. अनेकदा या मुक्या जनावरांची हेळसांड होते. अन्न पाण्याविना या जनावरांना फिरावे लागते. अनेक वेळा प्लास्टिक खाऊन त्यांचे आरोग्य खराब होते. याच्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे रात्री अपरात्री कसाई या गोवंशाची चोरी करतात. निर्जन भागात जाऊन या गोवंशाची कत्तल केली जाते. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन तातडीने शहरातील भटक्या गोवंशासाठी गोशाळा उभारली जावी. त्यामध्ये त्यांना निवारा आणि चारा मिळावा, अशी मागणी अखिल भारत कृषी गो सेवा संघाने भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली आहे.

अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे कुणाल साठे, निलेश चायकर, अभिजीत चव्हाण, ऋषी चावरे, पूजा जाधव यांनी याबाबत महेश लांडगे यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडच्या परिसरामध्ये जो पूर्वीचा ग्रामीण भाग आहे. त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये भटका गोवंश आपल्याला दिसतो आणि या गोवंशाची अत्यंत हेळसांड झालेली आहे. आपण गोमातेला देवता मानतो. आपली संस्कृती गोआधारित संस्कृती आहे. परंतु, या भटक्या गोवंशाची अनेकदा उपासमार होत असते आणि प्लास्टिक खाऊन त्यांचे आरोग्य खराब होते.

गो सेवा संघाचे कुणाल साठे म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या पूर्वीच्या ग्रामीण भागामध्ये हजारोंच्या संख्येने गोवंश आढळतो ज्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही. याबाबतीत महाराष्ट्र शासनाला योग्य निर्णय घ्यायला भाग पाडण्याची मागणी आमदार लांडगे यांच्याकडे केली. हा गोवंश वाचला पाहिजे. जपला पाहिजे याच्या करता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतंत्र गोशाळा निर्माण करावी. हा परिसर धार्मिक वैभव असलेला भाग आहे. आळंदी, देहू, चिंचवड ही पवित्र स्थाने आहेत. या ठिकाणी गोशाळेची स्थापना झाली, तर या धार्मिक वैभवात भर पडेल आणि त्याचबरोबर रस्त्यावरच्या वाहतुकीला मोकाट जनावरांमुळेच उपद्रव होतो तो संपूर्णपणे नाहीसा होईल . तसेच, आपल्या हिंदू संस्कृतीचे रक्षण होऊन त्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

भटक्या जनावरांच्या पुनर्वसनाच्या आणि गोवंश संवर्धनाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. दरवर्षी इंद्रायणी थडी सोबत आम्ही देशी गोवंश प्रदर्शन भरवतो. ज्यातून भावी पिढीला गोवन संवर्धन आणि जतन याची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केला जातो. अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांच्यामार्फत केलेल्या मागणीचा नक्कीच प्राधान्याने विचार केला जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
 महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे