नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे  

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे आज शासन निर्णय काढण्यात आला असून लवकरच शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  या योजनेअंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतक-यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण १९३२. ७२ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतक-यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते.  केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मना योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत. सातवा हप्ता अऩुदानाची शेतकरी अऩेक दिवसांपासून वाट पाहत होते.

आज प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना भेटणार आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना समोर ठेऊन दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. राज्यातील शेतक-यांना साथ देण्यासाठी राज्य सरकार व कृषी विभाग सातत्याने काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची महत्वाची योजना राबविली जाते. या योजनेचा सातवा हप्ता शेतक-यांना लवकरच मिळणार असून अतिवृष्टीमुळे अडचणीत असणा-या शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकाचे पंचनामे अंतिम टप्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतक-यांना लवकरच मदत मिळणार आहे.

Please follow and like us:

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न