पुणे
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही परिवर्तनकारी शक्ती आहे. त्याचा समाज, उद्योग आणि मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो आहे. चॅट-जीपीटी सारखी साधने कविता लिहिण्यास, गाणी लिहिण्यास, चित्रपट तयार करण्यास आणि संगीत निर्माण करण्यास सक्षम आहेत. ही एआय प्रणाली प्रचंड डेटा गोळा करते, त्याचे विश्लेषण करते आणि नवीन कल्पना निर्माण करते, असे प्रतिपादन वक्ते म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक आणि लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.
जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे आणि रायसोनी एज्युकेशन यांच्यातर्फे रायसोनी पुणे कॅम्पसमध्ये एआय आणि औद्योगिक क्रांती ४.० या विषयावर सदाग्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कॅम्पस डायरेक्टर आणि रायसोनी युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, रायसोनी युनिवर्सिटीचे प्रो-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे, संचालक डॉ. एच. आर. कुलकर्णी आणि जीएच रायसोनी पब्लिक स्कूलच्या प्राचार्य दिवेना शार्दुल यांच्यासह विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थित होते. लाभली.
डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना मांडणारे पहिले दूरदर्शी म्हणून अॅलन ट्युरिंग आणि औद्योगिक रोबोटिक्सचे प्रणेते म्हणून एंजेल बर्जर यांचा उल्लेख केला जातो. आजची इंडस्ट्री ४.० क्रांती ज्ञान-आधारित एआय, तज्ञ प्रणाली आणि डेटा-चालित तंत्रज्ञानाद्वारे कशी चालते हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी यावर भर दिला की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) मशीन ना मानवी भाषा कार्यक्षमतेने समजून घेण्यास आणि प्रक्रिया करण्यास सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आगामी काळात जवळजवळ २० टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, परंतु ८० टक्के नोकऱ्या बदलतील. भविष्यातील वर्ग खडू आणि बोर्डवर अवलंबून राहणार नाही, तर डिजिटल शिक्षणावर अवलंबून असेल. शिक्षक पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी व्हिडिओ आणि परस्परसंवादी सामग्री तयार करतील. एआय आणि डेटा विश्लेषण कौशल्ये सतत अपग्रेड करणे, इंग्रजी संवाद वाढविणे आणि उद्योजकीय क्षमता विकसित करणे हे विद्यार्थ्यांसमोर आवाहन असेल. एआय-चालित जगात टिकून राहण्यासाठी नवोपक्रम आणि अनुकूलता महत्त्वाची आहे.
या प्रसंगी बोलताना, रायसोनी पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, रायसोनीमध्ये, आम्ही नवोपक्रम, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस शिक्षण, उद्योग आणि समाजाचे भविष्य घडवत आहे. सदाग्यान सारख्या लेक्चर सिरीज उपक्रमांद्वारे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बुद्धिमान तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिवर्तनाच्या या नवीन युगासाठी तयार करण्याचे प्रयत्न करतो आहे.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी, विद्यापाठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्र- कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे, डॉ. एन. बी हुल्ले यांनी कार्यक्रम आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.
