पिंपरी :- वाकड येथील सम्राट चौक ते वाकड चौक या दरम्यानच्या दत्त मंदिर रस्त्याचे अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने सुरू काम सुरू आहे. हे काम तात्काळ थांबवून त्यात दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. हे काम न थांबल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही वाव्हळकर यांनी दिला आहे.
कुणाल वाव्हळकर यांनी म्हटले आहे की, वाकड परिसरातील भूमिपुत्रांनी वाकड दत्त मंदिर रोडचा विकास व्हावा यासाठी ४५ मीटर रस्ता व्हावा यासाठी आपली स्वतःची जागा दिली. वाकड परिसर झपाट्याने वाढत आहे. या रस्त्याची प्रचंड वाहतुक पाहता येथे मोठ्या रुंदीच्या रस्त्याची गरज आहे, असे असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने भ्रमनिरास केलेला आहे. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली ४५ मीटरचा रोड २४ मीटर केलेला आहे. तसेच उर्वरित जागेचा वापर ड्रायवे पार्किंग, फुटपाथ, ट्री लाईन, सायकल ट्रॅक, ड्रॉप ऑफ, पार्किंग यासाठी केला आहे. हे काम पाहता येथील व्यावसायिक बिल्डर्स यांना या रोडचा फायदा होईल अशा पद्धतीने सुरू आहे. यामध्ये महापालिका अधिकाऱ्याचे आणि बिल्डरांचे हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. हा अर्बन स्ट्रीटचा घाट कुणासाठी घातला जात आहे? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
वाकड परिसरामध्ये २०० ते २५० सोसायटी धारक आहेत. आणि त्यांना दररोज ट्राफिकच्या त्रासाला समोर जावे लागत आहे. म्हणून या ठिकाणी सुरू असलेल्या अर्बन स्ट्रीटच्या कामाला ताबडतोब स्थगिती देण्यात यावी अणि फुटपाथ कमी करून रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी अन्यथा नागरिकांच्या वतीने खूप मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कुणाल वाव्हळकर यांनी दिला आहे.
