महापालिकेचा कागदी कारभार; सुवर्णदीप रेसिडेन्सीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई फक्त व्हॉट्सॲपवरच?

पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा अजब कारभार समोर आला असून, प्रत्यक्ष जागेवर कारवाई न करता केवळ वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. चिंचवड येथील ‘सुवर्णदीप रेसिडेन्सी’ मधील अनधिकृत आणि वाढीव बांधकाम हटवण्याऐवजी केवळ कागदोपत्री ‘कारवाईचा खेळ’ सुरू असल्याचा संताप तक्रारदार सुवर्णा दिलीप पाटील यांनी थेट महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

पाटील यांनी मिडीयाला प्रतिक्रिया देताना सांगितले की,सुवर्णदीप रेसिडेन्सीमधील बेकायदेशीर बांधकामाविरोधात जुलै २०२५ पासून सातत्याने तक्रारी, ई-मेल आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. दरम्यान, २३ मार्च २०२६ रोजी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी एक ई-मेल पाठवून ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात सदर बांधकामावर कारवाई करण्यात आली असून त्याचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले आहेत असा दावा केला होता.जर ११ फेब्रुवारीला खरोखरच कारवाई झाली, तर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जे अनधिकृत बांधकाम दाखवले होते, ते आजही जसेच्या तसे कसे उभे आहे? मग व्हॉट्सॲपवर पाठवलेले फोटो नेमके कोणत्या इमारतीचे आहेत?

हा निव्वळ दिखाऊपणा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी सुरू आहे का? की आमच्या मनाची समजूत घालण्यासाठी? अशी बनवेगिरी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शोभते का? गेल्या नऊ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही बांधकाम परवाना विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय केवळ टाळाटाळ करत आहे.तसेच विकासकाने भोगवटा पत्रातील अटीची पूर्तता केलेली नाही.या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणावर ‘अर्थकारण’ दडले आहे. त्यामुळे आयुक्त यांनी स्वतः या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून, संबंधित दोषी क्षेत्रीय अधिकारी आणि बांधकाम परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करावी, तसेच सुवर्णदीप रेसिडेन्सीमधील ते अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष काढून टाकण्याचे आदेश द्यावेत.आता या ‘व्हॉट्सॲप बहाद्दर’ अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त काय ॲक्शन घेतात, याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले असल्याचे मत तक्रारदाराचे पती दिलीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप