मनोज सेठिया यांची शहर अभियंतापदी पदोन्नती 

पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज मोतीलाल सेठिया यांना ‘शहर अभियंता’ पदावर सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

  महापालिका आस्थापनेवरील ‘शहर अभियंता’ पद दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रिक्त झाले होते. या पदावरील पदोन्नतीसाठी दिनांक १८ जून २०२६ रोजी पदोन्नती समितीची सभा घेण्यात आली. समितीने शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व तसेच शिस्तभंगविषयक बाबींची पडताळणी करून सेठिया यांच्या पदोन्नतीची शिफारस केली.

  महापालिका सभा ठराव क्र. ४४, दिनांक २७ जानेवारी २०२६ अन्वयेही त्यांच्या पदोन्नतीस मान्यता देण्यात आली आहे.

  ही पदोन्नती संबंधित न्यायालयीन प्रकरणे, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका तसेच संबंधित शासन निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित रिट याचिकांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली आहे.

  शहर अभियंता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील विकासकामांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम दिशा मिळण्यास तसेच स्थापत्यविषयक कामकाजात प्रभावी समन्वय साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Related posts

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा 

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर