जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाचा कामकाज आढावा बैठक संपन्न

पुणे

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरण, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय, तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारीसंदर्भात तक्रार निवारण समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती, जमातीतील नागरिकांच्या तक्रारींचे गतीने निराकरण करण्याकरिता  पोलीस विभागाने सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक खिडकी योजना सुरु करुन त्याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचना सहायक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, समिती सदस्य, साखर  कारखान्याचे शेतकरी अधिकारी , स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. लोंढे पुढे म्हणाले,  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला. कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करुन पीडितांना न्याय मिळवून द्यावा. प्रलंबित गुन्हे गतीने निर्गत करण्याची पोलीस विभागाने कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील साखर कारखान्याने संबंधित ग्रामसेवकाशी समन्वय साधून ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात यावे. त्यांच्या आरोग्य तपासणीकरिता आरोग्य शिबीरे आयोजित करावी. कामगारांना नियमितपणे अन्नधान्य मिळेल याबाबत दक्षता घ्यावी. साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची तसेच मयत ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना सानुग्रह अनुदान मिळण्याच्यादृष्टीने मयत कामगार तसेच जनावरांची माहिती सादर करण्याकरिता एका प्रतिनिधींची नियुक्ती करावी, याबाबतचा अहवाल समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावा. कारखान्यानी वाहन एम-परिवहन ॲपवर नोंदणीकृत असल्याची खात्री करुन घ्यावी.

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करावी. ज्येष्ठ नागरिकांकरिता महानगरपालिका व ग्रामीण भागात नगरपालिका क्षेत्रात असलेल्या विरंगुळा केंद्राची माहिती समाज कल्याण विभागास सादर करावी. सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्याकरिता शिबाराचे आयोजन करावे, असेही श्री. लोंढे म्हणाले.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप