अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे निष्कासन

पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील वृंदावन कॉलनी, रहाटणी तसेच तापकीर मळा चौक, तापकीर नगर, रहाटणी या परिसरांमध्ये आज अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण अंदाजे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, त्या अनुषंगाने ही कारवाई राबविण्यात आली. सदर कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तर ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान उप अभियंता जयवंत रोकडे यांच्या समन्वयातून महापालिका धडक कारवाई पथकाने सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले व ज्ञानराज खंडाळे यांचा समावेश होता.

या मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची योग्य ती उपलब्धता करण्यात आली होती. कारवाईदरम्यान एम.एस.एफ.चे १२ जवान, १ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे ५ मजूर तसेच ठेकेदारामार्फत ४ मजूर उपस्थित होते. याशिवाय जेसीबी ब्रेकर १, ट्रॅक्टर ब्रेकर १ तसेच ४ हातोड्यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.

महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, नागरिकांनी बांधकाम करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Related posts

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू 

महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप